मुंबई: राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार आहे. मागील काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे. उद्धव आणि राज यांच्या युतीबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. पुढील काही तास ठाकरे बंधूंच्या युतीसाठी महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते करत आहेत. मात्र, मागील काही दिवसात आणि आजही राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ आणि उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर बैठकांचा धडाका सुरू असून हालचालींना वेग आला आहे.
advertisement
ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये महत्त्वाचा घटक ठरत असलेल्या जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटला असल्याची माहिती समोर आली आहे. मराठी बहुल भागातील अधिकाधिक जागा पथ्यावर पाडण्यासाठी ठाकरे गट आणि मनसेकडून जोर लावला जात आहे. ठाकरेंच्या काही विद्यमान नगरसेवकांच्या जागांवरही दावा करण्यात आला आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी?
मुंबई महापालिका निवडणुकीसह, ठाणे-नाशिकमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची औपचारिक घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. या ऐतिहासिक घोषणेसाठी पत्रकार परिषद घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे बंधूंकडून वरळी येथील NSCI डोममध्ये मोठ्या प्रमाणावर पत्रकार परिषद आयोजित करण्याचा विचार सुरू आहे. या परिषदेत युतीची अधिकृत घोषणा करत आगामी राजकीय वाटचालीबाबत स्पष्ट भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळाचे या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या युतीच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर आज मातोश्री येथे ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. युतीची अंतिम रूपरेषा, संयुक्त रणनीती आणि पुढील कार्यक्रमांबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, महायुती आणि महाविकास आघाडीतील हालचालींनाही वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. आता उद्याच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे बंधूंसोबत आघाडी? काँग्रेसचं काय ठरलं?
ठाकरे बंधूंसोबत काँग्रेस आघाडी करणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. काँग्रेसकडून वंचितसोबत आघाडीची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील काँग्रेससोबत आघाडी होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाने मुंबईत स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचे सांगितल्याचे त्यांनी म्हटले.
