शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निवासस्थान राहिलेला मातोश्री बंगला नेहमीच राजकीय घडामोडींचं केंद्रबिंदू राहिलाय. 1995 मध्ये सत्तेत आलेल्या युती सरकारचा रिमोट कंट्रोल याच मातोश्रीमध्ये होता. देशातील अनेक बडे नेते, उद्योगपतींनी मातोश्रीवर येवून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली होती. अनेक पक्षाच्या नेत्यांसाठी मातोश्रीची दारं उघडी होती. मात्र 2019 पासून मातोश्रीची दारं भाजपसाठी बंद झाली आहेत. मातोश्रीची दारं भाजपसाठी का बंद झाली याबाबत उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीत सविस्तर भाष्य केलं.
advertisement
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
आम्ही फडणवीस यांना दरवाजे बंद केले नाही. माणुसकी विसरणारा मी नाही. पण तुम्ही मातोश्री बदनाम करायला निघाला. मातोश्रीवर आरोप करायला निघाला, ते तोंड बंद करा, मातोश्रीचे दरवाजे उघडतील असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय. आमची कौटुंबिक बदनामी बंद करावी. जी कौटुंबिक बदनामी मी कधी केली नाही. माझ्याकडे माहिती असून केली नाही. खरा मित्र तो असतो जो तुमच्या चुका सांगतो. मातोश्रीत अमित शहांनी मला शब्द दिला आणि मोडला. त्या मातोश्रीच्या दरवाजाबाबत बोलत आहात. तुम्ही मातोश्रीच्या आतच होता. घरात घेऊन दार बंद केलं होतं. आता घराबाहेर जाऊन बंद केलं. शब्द मोडल्यामुळे मी दार बंद केलं, असं उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत सांगितलं.
आमच्यासाठी मुंबईकरांचा दरवाजा महत्त्वाचा : देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज18 मराठीचे संपादक मंदार फणसेंना दिलेल्या मुलाखतीत थेट भाष्य केलं. मातोश्रीचं दार आम्ही बंद केलं नाही, त्यांनीच आमच्याशी बोलणं टाळलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच आमच्यासाठी मुंबईकरांचा दरवाजा महत्त्वाचा असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
जुने मित्र मातोश्रीत दिसतील का?
ठाकरेंची शिवसेना आणि भाजपची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये मतभेदच नव्हे तर मनभेदही निर्माण झाले.आणि त्यातूनच मातोश्रीची दारं भाजपसाठी बंद झाली. त्यावर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. परिणामी जुने मित्र मातोश्रीत दिसतील का? या बाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीय.
