एकीकडे अर्थ संकल्प जाहीर होत असताना विधानभवनात उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमने सामने आल्याचं बघायला मिळालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजुला असणाऱ्या अंबादास दानवे यांना हस्तांदोलन केलं. तसेच ठाकरेंना हात जोडले. ठाकरेंसोबत असलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्याशी फडणवीसांनी दोन सेकंद बोलले. यावेळी अजित पवारांनी देखील ठाकरेंसोबत गप्पा मारल्या.
advertisement
हा तुमचा अर्थ संकल्प नाहीये, तुम्ही मर्सडीजचे भाव वाढवले नाहीत, असा चिमटा यावेळी ठाकरेंनी फडणवीसांना काढला. खरंतर, शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. एक पद मिळवण्यासाठी दोन मर्सडीज कार ठाकरेंना द्यावी लागते, याच आरोपावर ठाकरेंनी फडणवीसांना चिमटा काढला.
हे सगळं घडत असताना एकनाथ शिंदे मात्र उद्धव ठाकरे यांच्यासमोरून निघून गेले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे बघणंही पसंत केलं नाही. फडणवीस ठाकरेंशी गप्पा मारत असताना शिंदेंनी याकडे दुर्लक्ष केलं आणि ते तिथून निघून गेले. विधानभवनातील हा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकीकडे फडणवीस आणि ठाकरेंमधीली दरी कमी होत असताना, एकनाथ शिंदे मात्र महायुतीपासून दूर जाताना दिसत आहेत.
