नेमके काय घडले?
गटनेता निवडीसाठी आयोजित बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देणारे पत्र स्वीकारण्यासाठी हे चार नगरसेवक उपलब्ध नव्हते. अखेर जिल्हाप्रमुखांच्या स्वाक्षरीचे हे पत्र त्यांच्या घराच्या दरवाजावर चिकटवण्यात आल्याची माहिती शहरप्रमुख शरद पाटील यांनी दिली. दरम्यान, उर्वरित नगरसेवक आणि पदाधिकारी 'मातोश्री'वर रवाना झाले असून, तिथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटनेत्याच्या नावाची घोषणा करणार आहेत.
advertisement
बंडखोरीचे संकेत? कोण आहेत हे नगरसेवक?
'नॉट रिचेबल' असलेल्या नगरसेवकांमध्ये धक्कादायक नावे समोर येत आहेत. मधुर म्हात्रे आणि ॲड. कीर्ती ढोणे हे मूळचे शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते आहेत. तिकीट न मिळाल्याने त्यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. मात्र, विजयानंतर उद्धव ठाकरेंना भेटण्याआधीच त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आशीर्वाद घेतले आणि तेव्हापासून ते संपर्काबाहेर आहेत.
प्रभाग ४ मधील राहुल कोट आणि प्रभाग ६ मधील स्वप्नाली केणे हे दोघेही मनसे कार्यकर्ते असून त्यांनी ठाकरे गटाच्या तिकिटावर विजय मिळवला. हे दोघेही मनसे नेत्यांच्या भेटीला गेल्याचे समजते, त्यानंतर त्यांचा संपर्क तुटल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
'व्हिप'चा पेच आणि कायदेशीर लढाईची तयारी
उद्या नगरसेवकांनी "आम्हाला आदेश मिळालाच नाही" असा दावा करू नये, यासाठी शरद पाटील यांनी खबरदारी म्हणून पत्राच्या प्रती घराबाहेर चिकटवल्या आहेत. हा एक प्रकारे 'व्हिप' मानला जात असून, या नगरसेवकांनी पक्षादेश पाळला नाही तर त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असू शकते.
