शिवसेना ठाकरे गटाने पक्षाने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची महापालिकेतील गटनेत्या म्हणून नियुक्ती केली आहे. शिंदे गट आणि भाजपच्या युतीला सभागृहात रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पेडणेकर यांच्यासारख्या आक्रमक आणि अनुभवी नेतृत्वावर विश्वास टाकला आहे.
आक्रमक नेतृत्वाला संधी
महापौर म्हणून किशोरी पेडणेकर यांनी कोरोना काळात केलेले काम आणि विरोधकांना देणारी चोख प्रत्युत्तरे यामुळे त्या राज्यभर चर्चेत राहिल्या आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. आता बीएमसीमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे संख्याबळ वाढलेले असताना, सभागृहात शिवसेनेची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी पेडणेकर यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
advertisement
सभागृहात रंगणार संघर्ष
भाजपचे ८९ आणि शिंदे गटाचे २९ नगरसेवक एकत्र आल्यामुळे युतीचे पारडे जड झाले आहे. अशा स्थितीत ठाकरे गट आता विरोधी बाकांवरून आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. किशोरी पेडणेकर यांची आक्रमक शैली विरोधी पक्ष म्हणून कामी येईल, असे म्हटले जात आहे. पेडणेकर यांच्या नियुक्तीमुळे आता बीएमसी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी पाहायला मिळतील, हे स्पष्ट झाले आहे.
