मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेतृत्वाकडून “नव्या आणि तरुण कार्यकर्त्यांना संधी” देण्याचा निर्धार वारंवार व्यक्त केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र नातलगांना उमेदवारी मिळवून देण्यासाठीच पक्षातील वरिष्ठ नेत्यांची धावपळ सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. २०१७ नंतर आता होऊ घातलेल्या या महत्त्वाच्या निवडणुकीत अनेक निष्ठावान कार्यकर्ते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र, पक्षातील काही बड्या नेत्यांकडून भाऊ, पत्नी, मुलगा-मुलगी आणि सून यांच्यासाठी लॉबिंग सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
advertisement
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तर, दुसरीकडे अद्यापही शिवसेना ठाकरे गटासह कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवार जाहीर केले नाहीत. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या वाढली आहे. विशेषतः गेल्या अनेक वर्षांपासून संघटनात्मक काम करणारे कार्यकर्ते यावेळी संधी मिळेल या अपेक्षेने तयारीला लागले आहेत. मात्र, उमेदवारीच्या चर्चांमध्ये कार्यकर्त्यांपेक्षा ‘घरातीलच’ नावांना प्राधान्य दिले जात असल्याची कुजबुज पक्षातच सुरू आहे.
कोणी मुलांसाठी, कोणी सुनेसाठी मागतोय उमेदवारी...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी खासदार विनायक राऊत हे वाकोल्यातून आपल्या मुलगा किंवा मुलीसाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. माजी आमदार विनोद घोसाळकर हे दहिसर मतदारसंघातून आपली धाकटी सून पूजा घोसाळकर यांच्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जाते.तर ईशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील हे भांडुपमधून आपल्या मुलीसाठी उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्याच बरोबर माजी महापौर आणि ठाकरे गटाचे प्रतोद आमदार सुनील प्रभू हे गोरेगाव-दिंडोशीतून आपल्या मुलासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे आमदार अजय चौधरी हे परळ-शिवडीमधून आपल्या सुनेच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वरळीतील एका मोठ्या नेत्याने आपल्या मुलीसाठी वरळी प्रभागावर दावा केल्याचीही माहिती समोर आली आहे. आमदार सुनील शिंदे यांचे बंधूदेखील वरळी-प्रभादेवीमधून उमेदवारीसाठी जोर लावत असल्याची माहिती आहे.
माजी महापौर श्रद्धा जाधव यादेखील शिवडी-नायगांव भागातून आपल्या मुलासाठी इच्छुक आहेत. तर, माजी आमदार दगडू सकपाळ हे लालबागमधून आपल्या मुलीसाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात रंगली आहे.
मातोश्रीची डोकेदुखी वाढली...
एकीकडे ठाकरे गटाकडून ‘नव्या नेतृत्वाला संधी’ देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, दुसरीकडे नेते, आमदारांकडून आपल्या घरातील सदस्यांसाठी प्रयत्न केले जात आहेत. शिंदे यांनी पक्ष फोडल्यानंतरही या नेत्यांनी ठाकरेंना साथ दिली. तर, दुसरीकडे कठीण काळात पक्षासाठी जीव ओतून काम करणारे शिवसैनिक उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारी देताना मातोश्री काय निर्णय देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
