मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीनं हाहाकार उडवला. या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं 31 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं. मात्र यानंतरही अनेक शेतकरी या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. काही शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी मदत मिळालीय. या पार्श्वभूमीवर सरकारला दगाबाज रे म्हणत उद्धव ठाकरे या पॅकेजचा आढावा घेण्यासाठी चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीच्या पॅकेजबाबत उद्धव ठाकरेंनी सवाल केलाय. दिवाळी आधी शेतकऱ्यांना पैसे देणार होते. आता काय पंचांग काढताय की काय पैसे देण्यासाठी, अशी विचारणा ठाकरेंनी केली.
advertisement
काही दिवसांपूर्वी बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन केलं. त्यावर समितीची स्थापन करत येत्या 30 जूनपर्यंत कर्जमाफीचा शब्द महायुती सरकारनं दिलाय. कर्जमाफीबाबत सरकारच्या अभ्यास धोरणावर ठाकरेंनी सरकारला खडे बोल सुनावले.
जून महिन्यात कर्जमाफी कारण त्यांना आता निवडणूक काढायची आहे किंवा निवडणुका काढून घेण्यासाठी जूनचा वायदा केला आहे, असा आरोप करीत शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीनं करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांसह महायुती सरकारवर सवालाच्या फैरी डागल्यात. त्याचसोबत शेतकऱ्यांना आपली ताकद दाखवण्याचं आव्हान केलंय. शेतकरी म्हणून एकजूट व्हा, शेतकऱ्यांची ताकद दाखवून द्या, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनीही उत्तर देत, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलीय. तर उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या नावावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नी उद्धव ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. उद्धव ठाकरेंनी हा मुद्दा हाती घेतल्यानं शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहचवण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे.
