मुंबई: देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजप-एनडीए कडून राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली. तर, दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायलयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्याने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
advertisement
इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी आज 'मातोश्री'वर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि बी. सुदर्शन रेड्डी यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, देश एका विचित्र परिस्थितीमधून जात आहे. देशासाठी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक महत्त्वाची आहे. याआधीच्या उपराष्ट्रपतींनी अचानक राजीनामा दिला, त्याचे कारण प्रकृतीचे असल्याचे सांगण्यात आले. पण त्याचे खरं कारण समोर आले नाही.
चमत्कार घडवण्याची ताकद असलेले...
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आवश्यक संख्याबळ नसलं तरी देश वाचवण्यासाठी आम्ही लढतोय. संख्याबळावर निवडणूक अवलंबून असती तर निवडणूक घेण्याची गरज नसती. त्यांनी पुढं म्हटले की, या निवडणुकीत गोपनीयता आहे. मात्र, चमत्कार घडवण्याची ताकद असलेले आणि ज्यांच्या मनात छुप्या पद्धतीने देशप्रेम आहे ते इंडिया आघाडीला मदत करतील असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. चमत्काराला व्याख्या आणि आकार नसतो असेही त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सध्या असलेल्या संख्याबळानुसार सत्ताधारी भाजप-एनडीए उमेदवाराचा विजय निश्चित आहे. मात्र, या निवडणुकीत पक्षीय व्हीप लागू होत नाही. त्यामुळे इंडिया आघाडीकडून भाजपला धक्का मिळेल का याची उत्सुकता लागली आहे. तर, दुसरीकडे भाजपकडूनही सी.पी. राधाकृष्णन यांच्या पारड्यात अधिकचं मतदान खेचून बिहार निवडणुकीआधीच इंडिया आघाडीचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असणार आहे.