ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख आणि महापालिकेचे सभागृह तथा विरोधी पक्ष नेते प्रशांत वानखडे यांना आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश केला असून हा उद्धव ठाकरे यांना मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान आगामी निवडणुकीत रवी राणा आणखी काय खेळी खेळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
अमरावतीत मोठा धक्का
कालच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी उपमहापौर तसेच चार वेळा नगरसेवक असलेले राजेंद्र तायडे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडली असून आज ठाकरे यांना राणांनी दुसरा धक्का दिला आहे. तसेच ठाकरे गटाकडे नेतृत्व नसल्याने ठाकरे गट नेतृत्वहीन झाला आहे. त्यामुळे शिवसेना सोडत असल्याचं प्रशांत वानखडे यांनी सांगितला आहे.
महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. तब्बल पाच वर्ष रखडलेल्या महापालिका निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने होऊ घातल्या आहेत. त्यामुळे यंदा नगरसेवक व्हायचंच म्हणून चंग बांधलेल्या इच्छूकांनी उमेदवारीसाठी कोणत्याही पक्षात जाण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारीसोबतच राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे. यावेळची निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होत असून, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतरच्या बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे राजकीय पक्षांच्या नेते, पदाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे.
