आगामी मुंबईसह ठाणे आणि इतर महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मुंबईतील काही जागांवरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात वाद निर्माण झाल्याची चर्चा होती. अशातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठी अपडेट दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्वीट करून युतीच्या घोषणेचा दिवस आणि वेळ जाहीर केली आहे.
advertisement
शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती निश्चित झाली असून काल (२२ डिसेंबर) रात्री झालेल्या बैठकीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना सांगतिले होते. नाशिक, पुणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, ठाणे आदी महापालिकांमधील जागा वाटपांबाबत दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचे दिसून आले आहे.
मराठीबहुल जागांवर रस्सीखेच?
मराठीबहुल जागांवर रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा सुरू होती. यामध्ये शिवडी, वरळी, माहिम-दादर, दिंडोशी, भांडुप या विभागाचा समावेश होता. अखेर भागातील जागा वाटपावर तोडगा काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मनं जुळली पण युतीची घोषणा कुठं अडली होती?
उद्धव आणि राज ठाकरे हे कुटुंब म्हणून पुन्हा एकत्र आले आहेत. राजकीय मंचावरही एकत्र दिसले आहेत. मात्र, राज ठाकरे यांच्याकडून युतीच्या घोषणेवर अद्याप शिक्कामोर्तब केले जात नसल्याचे सांगत येत होते. जागा वाटपांचा तिढा सुटल्याशिवाय युतीची घोषणा नाही, असे मनसेच्या नेत्यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी म्हटले. युतीची घोषणा झाल्यास आणि जागा वाटपावरुन बिनसल्यास मनसेला त्याचा फटका बसण्याची भीती देखील व्यक्त केली जात होती. त्यामुळेच जागा वाटपाआधीच युतीची घोषणा टाळली जात असल्याचे म्हटले जात होते. अखेर आता, युतीच्या घोषणेची तारीख आणि वेळ जाहीर झाल्याने जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याची माहिती समोर आली आहे.
