मुंबई: जवळपास २० वर्षानंतर एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीने राज्यातील समीकरणे बदलणार असल्याची चर्चा सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभांचा धडाका असणार आहे. मात्र, त्याआधीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. शिवसेनेतून फारकत घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीवर भाष्य केले आहे.
advertisement
'दैनिक सामना' मध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी कॉमन मॅन म्हणून ठाकरे बंधूंना प्रश्न विचारले. या मुलाखतीत बोलताना उद्धव आणि राज यांनी थेट उत्तरं दिलीत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे फक्त सत्तेसाठी आणि आपल्या राजकीय अस्तित्वासाठी एकत्र आल्याचा आरोप सत्ताधारी बाकावरून करण्यात आला. सत्ताधाऱ्यांच्या आरोपावर आणि नरेटिव्हला ठाकरे बंधूंनी उत्तर दिले.
दोन दशकानंतर एकत्र का आलोत?
२० वर्षानंतर एकत्र का आलात या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी म्हटले की, काही गोष्टी का घडतात, कशा घडल्या, काय झालं? हे आज आता सोडून दिलं पाहिजे. महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत मी सांगितलं होतं की, कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज संकट महाराष्ट्रावर आहे, मुंबईवर आहे, महाराष्ट्रातील अनेक शहरांवर आहे. हे संकट काय आहे हे मराठी माणसाला समजलेलं आहे. काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे याची जाणीव त्याला आहे. ही एकच गोष्ट आम्ही एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी म्हटले की, आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही. महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. या विषयावर अनेक वर्षे मी बोलतोय, उद्धवही बोलतोय. आज अशा एका वळणावर ही निवडणूक आणि महाराष्ट्र उभा आहे, ज्याला आपण 'अभी नही तो कभी नहीं' म्हणतो तशा वळणावर. तशी परिस्थिती मुंबईवर, ठाण्यावर येऊन ठेपलेली आहे. खरं तर एमएमआर रिजनवर येऊन ठेपलेली आहे. एमएमआर रिजन मी मुद्दाम बोलतोय. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. आज एकत्र नाही आलो आणि आज एकजुटीने सामना नाही केला तर मला असं वाटतं, महाराष्ट्र आम्हाला माफ नाही करणार अशी भावनाही राज यांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, खरं तर, आम्ही दोन भाऊ एकत्र आलो हा भावनिक मुद्दा आहे. पण दोन भाऊ एकत्र आले याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसानं एकत्र आलं पाहिजे. महाराष्ट्र वाचवायचा असेल तर आपल्याला एकजूट दाखवावीच लागेल. पक्ष, राजकीय मतं वेगळी असतील, पण आपण मराठी आहोत. महाराष्ट्र आपला आहे आणि आपण जर एकमेकांमध्ये वेगळ्या चुली मांडल्या, तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जातील, असे उद्धव यांनी म्हटले.
