उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर माध्यमांशी संवाद साधला. त्यांच्या उपस्थितीत आज काही पक्ष प्रवेश झाले. शिवसेना ठाकरे गटातून काही महिन्यापूर्वीच शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्यासह शिवसैनिकांनीदेखील पक्षात प्रवेश केला.
उद्धव यांनी दिले महाराष्ट्राला हवं असलेलं उत्तर..
त्यानंतर उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केले. जे महाराष्ट्राच्या मनात आहे, तेच होणार असल्याचे उद्धव यांनी सांगितले. मनसेकडून युतीच्या प्रस्तावाची मागणी होत आहे. त्यावर उद्धव यांनी आता आम्ही काही संदेश देणार नाही तर बातमी देऊ असे सूचक वक्तव्य उद्धव यांनी केले. या मुद्यावरून आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नसल्याचेही उद्धव यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून मनसेला युतीची टाळी देण्याबाबत स्पष्टता असल्याचेही म्हटले जात आहे.
advertisement
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर उद्धव-राज यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केल्यानंतर आता मनसेकडून कोणती प्रतिक्रिया येईल, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा?
दरम्यान, ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्यानंतर मनसेकडून युतीचा प्रस्ताव सादर करण्याची मागणी करण्यात येऊ लागली. मनसे नेते अमित ठाकरे यांनी दोन्ही नेत्यांनी चर्चा करावी, आम्ही यात काही बोलणार नसल्याचे म्हटले.
त्यावर आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, 'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली देखील असेल. तुम्हाला फळ दिसल्याचे कारण आहे ना...फळ येण्यासाठी आधी मेहनत घ्यावे लागते. त्यानंतर झाडावर फळ येते. युतीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केले. दोन भावांमध्ये चर्चा होईल, पण या दोन भावांना फोनवर बोलण्यासाठी प्रस्तावाची गरज नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.