मुंबई : शिवसेनेच्या फुटीनंतर आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पडझडीनंतर शिवसेना ठाकरे गटासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. महाविकास आघाडी म्हणून मुंबई महापालिकेची निव़डणूक विरोधक लढवणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, काँग्रेसने स्वबळाची घोषणा दिल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी फुटली असल्याचे समोर आले आहे. या सगळ्या घडामोडीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली.
advertisement
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार हारुन खान यांनी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मु्द्यांवर प्रतिक्रिया दिली.
बिहार निवडणुकीवर काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, तेजस्वी यादव यांच्या सभेला मोठी गर्दी होती. मुख्यमंत्री म्हणतात, जो जिता वो सिकंदर…पण त्यामागचं राज काय? असा सवाल करताना तेजस्वींच्या सभेला एआयची गर्दी होती का, असा सवाल त्यांनी केला. ज्यांच्या सभेला गर्दी झाली नाही ते विजयी झाले असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. बिहारच्या विजयाचे गणित अनाकलनीय आहे. निवडणूक आयोगाने ६५ लाख मतदार काढले, पण त्यातील पुन्हा किती घेतले, याची माहिती नाही. वाढणारे मतदार कुठून येतात, असा सवालही त्यांनी केला. प्रादेशिक पक्षांना संपवायचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते असेही ठाकरे यांनी म्हटले. मुंबईत आम्ही मतदारयादीबाबत आक्षेप घेतले, त्यावरही काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याचे उद्धव यांनी सांगितले.
काँग्रेसच्या स्वबळावर काय म्हणाले उद्धव?
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसने स्वतंत्र लढल्यामुळे त्याचा फटका ठाकरे गटाला बसणार असून भाजपचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेसच्या भूमिकेबाबत विचारले असता, उद्धव ठाकरे म्हणाले की, ते त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्यास समर्थ आहेत. तर मी माझ्या पक्षाचा निर्णय घेण्यास समर्थ आहे.
काँग्रेसने बीएमसीच्या सर्व २२७ जागा स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीत मोठी दरी पडली असून, याचा थेट परिणाम शिवसेना (ठाकरे) गटावर होऊ शकतो, अशी चर्चा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबरोबर उभा राहिलेला मुस्लिम आणि अनुसूचित जात समुदायातील मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
