Uddhav Thackeray : ठाकरेंना काँग्रेसचा धक्का, भाजपला फायदा! २४ तासांमध्ये बीएमसीमधील सगळी गणितं बदलली
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Uddhav Thackeray Congress BMC : बिहार निवडणुकीच्या निकालाच्या २४ तासानंतर काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याने बीएमसी निवडणुकीच्या समीकरणात मोठा उलटफेर होणार आहे.
मुंबई : शिवसेनेच्या फुटीनंतर आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पडझडीनंतर शिवसेना ठाकरे गटासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. मात्र, मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी मैदानात उतरण्याआधीच शिवसेना ठाकरे गटाला काँग्रेसने धक्का दिला आहे. काँग्रेसच्या एका निर्णयाने भाजप-महायुतीचा फायदा होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बिहार निवडणुकीच्या निकालाच्या २४ तासानंतर काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याने बीएमसी निवडणुकीच्या समीकरणात मोठा उलटफेर होणार आहे.
काँग्रेसने बीएमसीच्या सर्व २२७ जागा स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीत मोठी दरी पडली असून, याचा थेट परिणाम शिवसेना (ठाकरे) गटावर होऊ शकतो, अशी चर्चा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबरोबर उभा राहिलेला मुस्लिम आणि अनुसूचित जात समुदायातील मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुस्लिम-दलित मतांची पुन्हा काँग्रेसकडे ओढा?
advertisement
राज्यातील मुस्लिम आणि दलित समाज मागील काही निवडणुकांत उद्धव ठाकरेंकडे झुकला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ठाम भूमिका घेतल्याने ठाकरे यांच्याबद्दल मुस्लिम मतदारांमध्ये आपुलकी निर्माण झाली होती. याचा फायदा शिवसेनेला २०१९ नंतरच्या निवडणुकांत स्पष्टपणे दिसला. मात्र काँग्रेसने बीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मुस्लिम मतदार पुन्हा त्यांच्याकडे वळू शकतात, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. ठाकरे-मनसे युती झाली, तर काँग्रेससाठी आघाडीत राहणे कठीण होईल, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळे आता बीएमसी निवडणुकीच्या समीकरणात मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत.
advertisement
काँग्रेसचा ‘स्वबळाचा नारा’ ठाकरे गटाला फटका?
मुंबई काँग्रेसने ठाम भूमिका घेत स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता काँग्रेसमुळे होणाऱ्या मतविभागणीचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. आघाडीत आम्हाला जिंकणाऱ्या जागा मिळत नव्हत्या. त्याशिवाय, आम्ही ज्या जागांवर दावा केला, त्याच जागा ठाकरेंनी घेतल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले. खेरवाडी, वर्सोवा, भायखळा, कुर्ला या आमच्या मजबूत जागा शिवसेनेला दिल्या गेल्या. भाजपविरोधी मजबूत आघाडी टिकावी म्हणून आम्ही तडजोड करत राहिलो, पण त्याचा फायदा झाला नसल्याचेही काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले. मुंबईत उत्तर भारतीय, मुस्लिम आणि अनुसूचित जात समुदायातील मते ही काँग्रेसची पारंपरीक मते आहेत. आता काँग्रेसने स्वबळाची घोषणा केल्याने ही मते ठाकरेंकडे किती वळणार आणि काँग्रेसकडे किती जाणार, यावर सगळी गणित अवलंबून असणार आहे.
advertisement
ठाकरे गटासाठी मोठी चिंता
काँग्रेस स्वतंत्रपणे लढत असल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. महाविकास आघाडीमुळे आलेली मुस्लिम मते पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीमुळे मुस्लिम आणि अनुसूचित जातींची मते ठाकरे गटाकडे वळली होती. आता ठाकरेंना ही मते आपल्याकडे खेचण्यासाठी रणनीती आखावी लागणार आहे.
तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात केलेली कामे, कोरोना काळात घेतलेले निर्णय, राज्यात कायम ठेवलेला जातीय सलोखा आदी कामे अजूनही मुस्लिम समुदायाला लक्षात आहेत. त्याशिवाय, महापालिकेच्या निवडणुकीत स्थानिक कार्यकर्ता, संघटना महत्त्वाची ठरते. त्यामुळे कार्यकर्त्यांची भूमिका, जनसंपर्क निर्णायक ठरणार असल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2025 1:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray : ठाकरेंना काँग्रेसचा धक्का, भाजपला फायदा! २४ तासांमध्ये बीएमसीमधील सगळी गणितं बदलली


