ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे न्यूज 18 लोकमतशी बोलत होते.यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवाव्यात अशा शिवसेनेच्या काही नेत्यांच्या भावना आहेत. यामागचं कारण म्हणजे, विधानसभेच्या 288 मतदार संघात आपली ताकद निर्माण व्हावी.जेणेकरून कोणत्याही निवडणुका सहज जिंकता येतील. त्यामुळे बैठकीत महापालिका स्वबळावर अशी चर्चा झाली आहे, असे दानवे यांनी सांगितले आहे.त्यामुळे दानवे यांच्या या विधानाने महापालिका निवडणुकीआधी महाविकास आघाडीत फूट पडण्याची चर्चा सूरू झाली आहे.
advertisement
तसेच शिवसेनेच्या पराभवाचे खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर फोडलं होतं. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा. ज्या भाजपने 132 जागा जिंकूनही त्यांना स्वत:चा नेता ठरवता येत नाही. ते त्यांनी बघावं.
लोकसभेत याच शिवसेनेने काँग्रेससोबत मिळून तुम्हाल नाकी नऊ आणले होते थोडक्यात हे बचावले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असे अंबादास दानवे म्हणाले.
अंबादास दानवेच्या स्वबळाच्या भूमिकेवर काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आघाडीमध्ये नुकसान झाला,फायदा झाला.पण जशी स्वबळाची त्यांची इच्छा आहे तशी आमचीही इच्छा आहे.त्यामुळे हा इच्छेचा विषय आहे. आम्ही आघाडी म्हणून लढलो, आता निकालानंतर ज्यांनी त्यांनी काय करायचा हा त्यांचा निर्णय आहे. आमची काय भूमिका आहे? हे आमचे प्रदेशाध्यक्ष मांडतील.पण आम्ही इतक्या घाईने आमची भूमिका मांडणार नाही. वरिष्ठ पातळीवर आम्ही आमच्या हायकमांडशी चर्चा करू. ही चर्चा झाल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असे विजय वड्डेटीवार म्हणाले आहेत.