साताऱ्यातील २०१७ मधील सुरुची राडा प्रकरण आणि नवीन मार्केट कमिटीतील जागेच्या वादावरून खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यासह मंत्री शिवेंद्रराजे यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. हे दोन्ही खटले सातारा न्यायालयात सुरू आहेत.
उदयनराजे आणि शिवेंद्रराजे दोघेही सातारा न्यायालयात
या प्रकरणात आज दोन्ही राजे गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यासोबत यावेळी शेकडो कार्यकर्ते होते. जिल्हा न्यायालयाच्या परिसरात दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
advertisement
खिंडवाडीच्या नवीन मार्केट कमिटीच्या प्रकरणाचा निकाल
सातारा जिल्हा न्यायालयाने शनिवारी खिंडवाडी येथील नवीन मार्केट कमिटीच्या प्रकरणाचा निकाल लावला. दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी आपल्या तक्रारी माघारी घेतल्यामुळे हा खटला जिल्हा सत्र न्यायालयाने निकाली काढला.
सुरूची बंगल्यासमोरील राडा प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग
तर आणेवाडी टोल नाका व्यवस्थापनाच्या प्रकरणावरून 2017 मध्ये शिवेंद्रराजे यांच्या सुरूची निवासस्थानासमोर झालेल्या दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांमधील राडा प्रकरण हे गंभीर गुन्ह्यातील असल्यामुळे हे प्रकरण सत्र न्यायालयाकडून जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे.
दोन्ही राजेंसमवेत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, उदयनराजेंचे आशीर्वाद घेऊन शिवेंद्रराजे मार्गस्थ
या दोन्ही खटल्याप्रसंगी सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दोन्ही राजेंनी उपस्थिती लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली. खटला संपन्न झाल्यावर उदयनराजेंचे आशीर्वाद घेऊन शिवेंद्रराजे मार्गस्थ झाले.