नागपूरमध्ये विदर्भ गौरप प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या स्वर्गीय अनिलकुमार पत्रकारीता पुरस्कार सोहळ्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना पंतप्रधान पदाबाबत खुलासा केला. ते म्हणाले की, मला एका नेत्याने पंतप्रधानपदाची ऑफर दिली. मी नाव नाही सांगत त्या नेत्याचं पण ते म्हणाले की तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. मी त्यांना म्हटलं तुम्ही मला का पाठिंबा देणार? मी का घेऊ तुमचा पाठिंबा, पंतप्रधान होणं हे माझं ध्येय नाही.
advertisement
पंतप्रधान पदाची ऑफर नाकारताना गडकरींनी काय कारण दिलं हेसुद्धा त्यांनी कार्यक्रमात सांगितलं. ते म्हणाले की, मी माझ्या आस्थेशी आणि माझ्या संस्थेशी एकनिष्ठ आहे. कोणत्याही पदासाठी मी माझ्या आस्थेशी आणि संस्थेशी तडजोड करणार नाही. मी एक विचारधारा मानणारा व्यक्ती आहे. मला जे हवं होतं ते सगळं पक्षाने दिलं. कोणताच प्रस्ताव मला मोहात पाडू शकत नाही असंही गडकरींनी स्पष्ट केलं.
लोकसभा निवडणुकीवेळी आपल्याला पंतप्रधान पदासाठी पाठिंब्याची ऑफर देण्यात आली होती. पण माझ्यासाठी संघटना सर्वात वरती आहे. त्यामुळे मी ऑफर धुडकावली. मी माझ्या तत्त्वाशी तडजोड करत नाही असं नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले.