संपूर्ण वस्तीत एकदम शांतता पसरते. काळोख आणि किड्यांचा किर्रर्र आवाज आणि दबक्या पावलांनी तो येण्याची भीती मनात घर करुन असते. दिवसा इथे शेतकरी आणि मजूर जीव वाचवण्यासाठी थाळ्यांचा आवाज करतात, फटाके फोडतात किंवा पत्र्याचे डबेही जोरात वाजवत राहतात. त्यामुळे त्यांचा जीव सुरक्षित आहे असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यांना पावला पावलावर भीती असते.
advertisement
इथे ग्रामस्थांनी पाळलेल्या बकऱ्या, कोंबड्याच काय अगदी गायी आणि वासरं देखील भयभीत आहेत. दहशतीखाली आहेत. ग्रामस्थांना तर वासरं बाईकवरुन फिरवण्याची वेळ आली आहे. ही दहशत आहे बिबट्याची. मागच्या काही दिवसांपासून बिबट्याचे हल्ले वाढत चालले आहेत. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. कधी घराबाहेर, शेतात तर कधी थेट घरात घुसून आता बिबट्या हल्ला करायला लागला आहे.
शेतकरी वासरं आणि बकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना गाडीवरुन घेऊन ये जा करत आहेत अशी परिस्थिती आहे. हे गाव आहे जळगावमधील वरखेडे इथलं. या गावाचा एक भाग टेकडीवर वसलेला आहे. काही अंतरानंतर संपूर्ण जंगलच सुरू होतं. उंच कुंपण घातलं तर कुंपणाचे खांबच चोरून नेल्याचा प्रकार झाला. कुंपण नावालाच राहिलं आणि बिबट्यासाठी मेजवानी झाली. तिथे ग्रामस्थांनी सांगितलेल्या अनुभव फार भयंकर होता.
दिव्य मराठीने दिलेल्या माहितीनुसार त्या गावात दिवस बिबट्या अक्षरश: झाडावर बसून असलेला देखील पाहिला आहे. दर दिवस शेतात काम करत असताना जीव वाचवण्यासाठी सतत थाळी वाजवत राहावी लागते. जेणेकरुन बिबट्या येऊ नये. एका शेतकऱ्याची वासरं या बिबट्याने पळवल्याचं दु:खं तच्याने व्यक्त केलं. आता तो आपली उरलेली वासरं गाडीवरुन घेऊन जात असल्याचं सांगितलं.
बिबट्याच्या भीतीनं इथे शेतीच्या कामासाठी माणसं मिळत नाहीत. त्यामुळे घरातल्यांनाच शेतात जावं लागतं. शेतात बिबट्याच्या हल्ल्याची सारखी भीती असतेच. पण पोटाचा प्रश्न आहे त्यामुळे करावं लागतं. संध्याकाळी शेकोटी पेटवणे, फटाके फोडणे यासारख्या गोष्टी करुन लोक आपला जीव वाचवत आहेत. सध्या हे संपूर्ण गाव बिबट्याच्या दहशतीखाली आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्रातील वाढणारे बिबट्याचे हल्ले हा एक चिंतेचा विषय होत चालला आहे.
