विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नालासोपाऱ्यात मोठी खळबळ उडाली. पेल्हार फाटा परिसरात तब्बल दहा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रोकड भाजपाची असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून मतदारांना वाटप करण्यासाठी ती नेली जात होती का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे दोनच्या सुमारास पेल्हार फाटा येथे एका संशयित इसमाच्या हालचाली नागरिकांच्या लक्षात आल्या. संशय बळावल्याने काही स्थानिक नागरिकांनी त्याच्या वाहनाचा पाठलाग करून गाडी अडवली. त्यानंतर घटनेची माहिती तात्काळ पेल्हार पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताच्या वाहनाची झडती घेतली असता, वाहनामध्ये भाजपाचा लोगो असलेली पिशवी आढळून आली.
advertisement
या पिशवीमध्ये आणखी एक प्लास्टिकची पिशवी ठेवण्यात आली होती. तपासणीदरम्यान या पिशवीतून रोख दहा लाख रुपये सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही रक्कम कोणत्या उद्देशाने नेली जात होती, याबाबत समाधानकारक माहिती संशयिताकडून मिळू शकलेली नाही. त्यामुळे ही रोकड निवडणूक काळात मतदारांना वाटण्यासाठीच नेली जात असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. व्हिडीओनुसार, एका बंद पाकिटात ही रक्कम ठेवण्यात आली होती. अशी अनेक बंद पाकीटे जप्त करण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांनी संबंधित संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेली रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली असून, या रकमेचा स्रोत, तसेच तिचा राजकीय पक्षाशी असलेला संबंध याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. पुढील तपास पेल्हार पोलीस करत आहेत.
