नवी दिल्ली : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आता अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली आहे. पुढच्या बुधवारी महाराष्ट्राच्या सर्व 288 जागांवर मतदान पार पडणार आहे, त्याआधी सोमवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यासाठी काँग्रेसने खास रणनीती आखली आहे. काँग्रेसचे देशातील तीन मोठे नेते महायुतीला घेरणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राज्यातील महायुतीच्या नेत्यांना घेरणार आहेत.
advertisement
भाजपच्या बटेंगे तो कटेंगेच्या मुद्द्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे घेरणार आहेत. राज्यतील दलित आणि मुस्लिम समाजाची मतं सोबत घेण्यासाठी खरगे भाजपच्या या नाऱ्याला विरोध करत प्रचार करणार आहेत. तर राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी महायुतीला लक्ष्य करणार आहेत. आरक्षण द्यायचं असेल तर आरक्षणाची मर्यादा ओलांडणं हाच पर्याय असल्याचा मुद्दा राहुल गांधी यांच्याकडून प्रचारसभेत वारंवार मांडला जाणार आहे.
महिलांच्या योजना प्रियंका गांधी समजावून सांगणार आहेत. काँग्रेसशासित इतर राज्यात सुरू असलेल्या योजना आणि त्याचा फायदा यावर प्रियंका गांधी महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. भाजपच्या नेत्यांकडून ज्या प्रकारे एक एक मुद्दा घेऊन प्रचार केला जातो, त्याला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने ही रणनीती ठरवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.