महादेव मुंडे प्रकरणात आता अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एकेकाळी वाल्मिक कराडचे सहाकरी विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा नोंदवण्यात आला आहे. या जबाबात बांगर यांनी वाल्मिक कराडसह त्याच्या मुलाचेदेखील नाव घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, कराड कुटुंबाच्या अडचणींमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
advertisement
एसआयटीच्या तपासाला वेग येण्याची शक्यता
महादेव मुंडे यांच्या हत्येमागील कट, त्यामध्ये सहभागी असलेली व्यक्ती आणि घटनाक्रम यासंदर्भात बांगर यांनी महत्त्वाची माहिती दिल्याचे समजते. या जबाबामुळे तपास यंत्रणांना ठोस धागे मिळण्याची शक्यता असून, एसआयटीच्या तपासाला वेग येण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, आजच या प्रकरणातील दोन संशयितांची नार्को टेस्ट करण्यात येत असून, त्यातून आणखी महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.
कडक कारवाईची मागणी
सध्या वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. त्यातच आता महादेव मुंडे हत्येप्रकरणातील नव्या खुलाशांमुळे कराड आणि त्याच्या मुलाविरोधातील कायदेशीर कारवाई अधिक कडक होण्याची शक्यता आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास एसआयटीकडून सुरू असून, लवकरच मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तपासातून धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
या संपूर्ण प्रकरणाकडे राज्यभरातील जनतेचे लक्ष लागले असून, दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पुढील काही दिवसांत तपासातून कोणते नवे धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
