मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही कार धोत्रा बाजूकडून अल्लीपूरच्या दिशेने जात होती. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे किंवा वेगामुळे स्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला कारने मागून जबर धडक दिली. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. ट्रकला धडक बसताच कारचा समोरील भाग पूर्णतः चेंदामेंदा झाला. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, कारचे झालेले नुकसान पाहता, आतील प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले.
advertisement
या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या वैभव शिवणकर, निशांत वैद्य आणि गौरव गावंडे या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातामध्ये कारमधील चौथा तरुण भूषण वडणेरकर हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ घटनास्थळावरून हलवून उपचारासाठी सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर तातडीचे उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या अपघातामागील नेमके कारण काय होते आणि ट्रक रस्त्यावर कसा उभा होता, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या अपघातामुळे धोत्रा-अल्लीपूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
