शेकापूर (बाई) येथे वास्तव्यास असलेल्या तिजारे कुटुंबात कौटुंबिक वाद होता. या वादातून दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दिनेशचे वडील शालीक यांनी दिनेशच्या खोलीला कुलूप लावले. दरम्यान, दिनेशची मुलगी शाळेतून घरी आली. त्यामुळे दिनेशने वडिलांना खोलीला कुलूप का लावले? आणि तुम्ही दार का उघडत नाही? अशी विचारणा केली. यावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपास जाऊन दिनेशने वडिलांवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला. वडनेर पोलिसांनी आरोपी मुलास ताब्यात घेतले आहे.
advertisement
क्षणिक रागाच्या भरात मुलाने कुऱ्हाडीने सपासप वार करून वडिलांना जागीच ठार केले. ही माहिती गाव परिसरात पसरली. काही वेळाने घटनास्थळी गर्दी झाली. लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास शालीक तिजारे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वडनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वडनेर पोलिस करीत असल्याचे सांगण्यात आले.