आकाश अढागळे हे 2010 साली भारतीय सैन्यातील महार रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. भारतीय सैन्यात मागील 13 वर्षापासून देशाची सेवा करत असताना शिरपूरच्या या शूर सैनिकाला आलेल्या वीर मरणामुळे शिरपूरसह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. आकाश अढागळे हे येत्या 15 दिवसात गावी येणार होते. मात्र, त्या अगोदरचं नियतीने डाव साधला आणि आकाश अढागळे यांना वीरगती प्राप्त झाली. आकाश यांचं 4 सप्टेंबर रोजी कुटुंबियांसोबत मोबाईलवरून झालेलं संभाषण अखेरचं ठरलं.
advertisement
आकाश अढागळे यांचे मोठे भाऊ नितीन अढगळे हे भारतीय सीमा सुरक्षा दलात आसाम मधील चिन सीमेवर सेवा देत असून त्यांचे लहान भाऊ उमेश अढागळे हे देखील महाराष्ट्र सुरक्षा बलात कर्तव्य बजावत आहेत. आकाश अढागळे यांच्या पश्चात आई, पत्नी रुपाली त्यांची चार वर्षीय मुलगी तन्वी, दोन भाऊ आणि एक बहीण असा आप्त परिवार आहे. आकाश अढागळे यांच्या पार्थिवाला लेहच्या लष्करी मुख्यालयात सकाळी मानवंदना दिली जाईल. त्यानंतर त्यांचे पार्थिव दिल्लीच्या लष्करी मुख्यालयात आणल्यावर तिथे लष्करी मानवंदना देऊन विमानाने नागपूरला आणले जाईल.
वाचा - जरांगे पाटलांनी 24 तासांपासून सोडलंय पाणी, उपचार घ्यायला दिला नकार
नागपूरवरुन लष्कराच्या गाडीत पार्थिव शिरपूर गावात आणले जाणार असून नागरिकांच्या अंतिम दर्शनासाठी ते ठेवले जाणार आहे. त्यानंतर लष्करी इतमामात त्यांच्यावर मंगळवारी रात्री किंवा बुधवारी सकाळी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. देशाच्या या सुपुत्राला अंतिम निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय उलटणार आहे.
