अकोटमध्ये नगर परिषदेत भाजप आणि एमआयएमची युती झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. अखेरीस अकोटचे एमआयएमचे नेते युसुफ पुंजानी यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देत भाजपवर गंभीर आरोप केले आहे. "अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाली अशी बातमी समोर आली. याबद्दल मला आमचे नेते इम्तियाज जलील यांचा फोन आला होता आणि त्यांनी विचारणा केली कोणत्या सिद्धांतावर ही युती झाली आहे. मी माझ्या नगरसेवकांना फोन केला. तेव्हा नगरसेवकांनी सांगितलं की अकोट येथील आघाडीतील नगरसेवकांनी ‘अकोट विकास मंच’ स्थापन केली आहे. त्या ठिकाणी कुणाकडेही बहुमत नव्हतं. शहराच्या विकासासाठी ठराव घेण्यात आला होता. त्यामुळे नगरविकास आघाडी स्थापन केली, त्यामध्ये सामील झालो. पण त्यांना हे माहिती नव्हतं की, यामध्ये भाजप होती आणि महायुतीचे घटक सुद्धा होते. राष्ट्रवादी तुतारी आणि ठाकरे गटाचे सदस्य सुद्धा होते, अशी माहिती पुंजानी यांनी दिली.
advertisement
भाजप आणि आमचे विचार हे वेगवेगळे आहे. त्यामुळे आमच्या पक्षाने नगरसेवकांना तातडीने नगरविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहे. जर युतीतून बाहेर पडले नाहीतर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा ही पुंजानी यांनी आपल्या नगरसेवकांना दिला. या सर्व घडामोडींनंतर एमआयएम या युतीतून बाहेर पडल्याचं युसुफ पुंजाजी यांनी स्पष्ट केलं आहे.
MIM सोबत नव्हे उमेदवारासोबत युती, भाजपचा अजब दावा
दरम्यान, भाजपकडूनही या युतीबाबत काहीशी माघार घेतल्याचं चित्र दिसत आहे. "आपली देशाची संस्कृती ही सामाजिक समरसतेची संस्कृती आहे. भारतीय जनता पक्ष कधीच मुस्लिमांच्या विरोधात नव्हता. भाजप हा एमआयएमच्या विरोधात आहे. मुस्लिम आणि एमआयएम वेगवेगळ्या पद्धतीने पाहत आहे. निवडणुकीच्या दरम्यान, एमआयएमच्या चिन्हावर ५ नगरसेवक निवडून आले. पण, निवडणुकीच्या नंतर या ५ नगरसेवकांच्या मनामध्ये विचार आला की अकोट नगरविकास आघाडीमध्ये सामील झालं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या एमआयएम पक्षाचे विचार सोडून आमच्यासोबत आले. आम्ही काही त्यांना जबरदस्ती केली नाही. अकोट नगरविकास मंचामध्ये ३१ पैकी ११ नगरसेवक हे भाजपचे होते, त्यामुळे त्यांनी विचार करायचा होता, आमच्यासोबत यायचं की नाही. आम्ही एमआयएम सोबत नव्हे, तर केवळ उमेदवारांशी युती केल्याचा दावा भाजप आमदार रणवीर सावरकर यांनी केला आहे.
तसंच, भाजपची विचारधारा मान्य करून एमआयएम पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपासोबत येणाऱ्या उमेदवारांशीच युती कायम ठेवली जाईल, असंही सावरकर यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, या घडामोडींमुळे अकोट नगरपरिषदेतील सत्तास्थापनेचा पेच अधिकच वाढला असून, राजकीय वातावरण तापलं आहे.
