Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीच्या काळात लहान मुलांना बोरन्हाण का घालतात? तुम्हाला माहितीये का परंपरा?
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मकर संक्रांत सणामध्ये एकमेकांना तिळगुळ देणे, पतंग उडवणे आणि हळदी-कुंकवाचे कार्यक्रम यांसारख्या खास परंपरा असल्यामुळे, सर्वजण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. या सणांमध्ये आणखी एक उत्सुकतेचे कारण म्हणजे बोरन्हाण... 1 ते 5 वर्षांच्या मुलांचे बोरन्हाण केले जाते.
पुणे: मकर संक्रांतीची तयारी सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. बाजारात हलव्याचे दागिने, पारंपरिक कपडे आणि सणासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मकर संक्रांत सणामध्ये एकमेकांना तिळगुळ देणे, पतंग उडवणे आणि हळदी-कुंकवाचे कार्यक्रम यांसारख्या खास परंपरा असल्यामुळे, सर्वजण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. या सणांमध्ये आणखी एक उत्सुकतेचे कारण म्हणजे बोरन्हाण... 1 ते 5 वर्षांच्या मुलांचे बोरन्हाण केले जाते. लहान मुलांचे बोरन्हाण घालण्याची प्रथा आजही अनेक घरांमध्ये जपली जाते. बोरन्हाण का केले जाते यामागचे काय कारण आहे हे जाणून घेणार आहोत.
बोरन्हाण का घालतात?
बोरन्हाण घालण्यामागे अशी आख्यायिका आहे की, करी नावाचा राक्षस होता. या राक्षसाची वाईट दृष्टी आणि विचार मुलांवर पडू नये म्हणून सुरुवातीला ही प्रथा कृष्णावर केली गेली. नंतर ही परंपरा घराघरात पसरली आणि लहान मुलांचे बोरन्हाण करण्याची प्रथा सुरू झाली. बोरन्हाण करण्यामागे दुसरे वैज्ञानिक कारण असे आहे की, संक्रांतीच्या काळात वातावरणात अनेक बदल होत असतात.
advertisement
या बदलांमुळे मुले आजारी पडण्याची शक्यता असते. म्हणून या काळात मिळणारी फळे खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. बोरन्हाण प्रथेनुसार बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, हलक्या पद्धतीने मुलांच्या डोक्यावरून टाकले जातात. इतरवेळी ही फळे मुले सहज खात नाहीत, पण खेळाच्या माध्यमातून ती उचलून खातात. यामुळे मुलांचे शरीर सुदृढ राहते आणि पुढील ऋतु बदलांसाठी त्यांना ताकद मिळते.
advertisement
बोरन्हाण कसं घालतात?
view commentsसाधारणपणे मकर संक्रांती पासून ते रथसप्तमी पर्यंत घरातील लहान मुलांचे बोरन्हाण केले जाते. आता यंदा मकर संक्रांती 14 जानेवारीला आणि रथसप्तमी 25 जानेवारीला आहे. 14 ते 25 जानेवारी पर्यंत तुम्ही घरातील लहानग्यांचे बोरन्हाण करू शकता. अलीकडे पालक परंपरेबरोबर आपल्या मुलाची हौस व्हावी म्हणून सुद्धा बोरन्हाण करतात. गेल्या काही वर्षांपासून ही प्रथा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. बोरन्हाण करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवले जाते. मुलांना पाटावर बसवून औक्षण केले जाते. त्यांच्या डोक्यावर हलक्या हाताने मुरमुरे, बत्तासे, तिळाच्या रेवड्या, बिस्कीट, गोळ्या, बोरं, उसाचे तुकडे टाकले जातात. मुले ही फळे आणि पदार्थ गोळा करून खातात. अशा पद्धतीने बोरन्हाण पारंपरिक रीतीने घालतात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 5:27 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीच्या काळात लहान मुलांना बोरन्हाण का घालतात? तुम्हाला माहितीये का परंपरा?










