मुंबई : रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची आणि इशारा देणारी बातमी समोर आली आहे. जर तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून रेशन कार्डवर धान्य उचलले नसेल, तर तुमचे रेशन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी नवा नियम लागू केला असून, त्यानुसार सलग सहा महिने रेशन न घेणाऱ्यांचे रेशन कार्ड निष्क्रिय (इनअॅक्टिव्ह) केले जाणार आहे. त्यामुळे सर्व रेशन कार्डधारकांनी या नियमाची माहिती घेणे अत्यंत आवश्यक ठरते.
advertisement
नियम काय?
केंद्र सरकारने जुलैमध्ये “लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) सुधारणा आदेश, 2025” अधिसूचित केला आहे. या आदेशानुसार, एखाद्या कुटुंबाने सलग सहा महिने रेशन दुकानातून धान्य उचलले नाही, तर त्या कुटुंबाचे रेशन कार्ड आपोआप अॅक्टिव्ह राहणार नाही.
सरकारच्या या निर्णयामागे मुख्य उद्देश म्हणजे बनावट, दुहेरी आणि अपात्र रेशन कार्डांची संख्या कमी करणे. सध्या देशात सुमारे 23 कोटी अॅक्टिव्ह रेशन कार्ड आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, या छाननी प्रक्रियेमुळे 7 ते 18 टक्के रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. सरकारने राज्यांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत रेशन घेण्यास पात्र असलेले, मात्र प्रत्यक्षात रेशन न घेणारे लाभार्थीही या कारवाईच्या कक्षेत येणार आहेत. म्हणजेच, केवळ पैसे न भरता रेशन मिळत असले तरी ते उचलले नसेल, तर संबंधित कार्ड निष्क्रिय होऊ शकते.
दर 5 वर्षांनी तपासणी होणार
आता रेशन कार्डधारकांची पात्रता दर पाच वर्षांनी तपासली जाणार आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रेशन कार्डवर नोंद असलेल्या पाच वर्षांखालील मुलांचा आधार क्रमांक नोंदवणे आवश्यक राहील. मुलांचे वय पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांचे ई-केवायसी करणे बंधनकारक असेल. जर एखाद्या रेशन कार्डमध्ये दुहेरी नोंद आढळून आली, तर असे कार्ड तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाईल आणि त्यानंतर केवायसी प्रक्रियेद्वारे अंतिम निर्णय घेतला जाईल.
नवीन रेशन कार्ड देण्याची प्रक्रिया देखील बदलली जाणार आहे. यापुढे ‘प्रथम या' या तत्त्वावर नवीन रेशन कार्ड मंजूर केली जातील. प्रत्येक राज्याने आपल्या पोर्टलवर प्रतीक्षा यादी (वेटिंग लिस्ट) जाहीर करणे बंधनकारक असेल.
