जालना: जालना शहरातील नामांकित 'संत गजानन हॉस्पिटल'मध्ये एका कर्मचाऱ्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अमोल दोडके असे मृत तरुणाचे नाव असून, तो हॉस्पिटलच्या शस्त्रक्रिया विभागात कार्यरत होता. नेहमीप्रमाणे नाईट ड्युटीसाठी गेलेला हा तरुण सकाळी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळल्याने या मृत्यूमागे घातपात आहे की आत्महत्या, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
advertisement
अमोल दोडके हा मागील महिनाभरापासून संत गजानन हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया विभागात काम करत होता. अमोलला या क्षेत्रातील तब्बल 15 वर्षांचा दीर्घ अनुभव होता. नेहमीप्रमाणे तो रात्री कामासाठी हॉस्पिटलमध्ये गेला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने आणि त्याचा मोबाईल बंद लागत असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. नाईट शिफ्टमुळे कदाचित तो कामात व्यस्त असेल, अशा अंदाजाने कुटुंबीयांनी रात्र काढली. मात्र, सकाळ होऊनही अमोलचा काहीच पत्ता लागत नसल्याने कुटुंबीयांनी थेट हॉस्पिटल गाठले.
हॉस्पिटल प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये पोहोचले असता त्यांना धक्काच बसला. अमोलचा मृतदेह हॉस्पिटलच्या परिसरात फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. हे विदारक दृश्य पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. एका अनुभवी आणि जबाबदार कर्मचाऱ्याचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने हॉस्पिटल प्रशासनाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज (CCTV) तपासण्याचे काम सुरू असून, रात्री कर्तव्यावर असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणात घातपाताची शक्यता व्यक्त केली असून, शवविच्छेदन अहवालानंतरच या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे
