स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर हॉटेल आणि कॅफे बांधण्याचा प्रमाद रोप वे कंपनीनं केलाय. रायगडावरील हॉटेलचे फोटो पाहून राज्यभरातील शिवप्रेमी प्रचंड संतापले आहेत. संभाजीराजे छत्रपतींनी फेसबुकवर त्या हॉटलचे फोटो पोस्ट करत तीव्र संताप व्यक्त केलाय. रायगडाच्या अस्मितेपेक्षा मोठे काहीही असू शकत नाही, अशा जळजळीत शब्दात संभाजीराजे छत्रपतींनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत.
advertisement
संभाजीराजे छत्रपतींनी त्यांच्या पोस्टमध्ये काय लिहिलंय?
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा भग्नावस्थेत आहे. त्याचे संवर्धन करायला पुरातत्व विभागाचे नियम आणि अडथळे आहेत. रायगड विकास प्राधिकरणाला गडावरील एक दगडही हलवू देत नाहीत. पण रोपवे कंपनीस मात्र रायगडावर विनापरवानगी हॉटेल, रेस्टोरेंट, कॅफे आणि सिमेंट काँक्रीटचे भव्य राजवाडे बांधण्यास खुली मुभा दिली आहे. नाममात्र नोटिसा दिल्यानंतरही कामे पूर्ण करण्यात आली आहेत. एका व्यावसायिक कंपनीकडे इतके धाडस व आडमुठेपणा येतो कुठून? दुर्गराज रायगड युनेस्को जागतिक वारसास्थळ घोषित झाला आहे. गडावर अशी बेकायदेशीर बांधकामे होत राहिली तर हे नामांकन देखील धोक्यात येऊ शकतं. याला जबाबदार कोण असणार? रायगडाच्या अस्मितेपेक्षा मोठे काहीही असू शकत नाही.
कंपनीवर कठोर कारवाई होणार?
धक्कादाययक बाब म्हणजे रोप वे कंपनीकडून करण्यात आलेल्या बांधकामाला केंद्रीय पुरातत्त्व विभागानं परवानगी दिलेली नव्हती. 15 सप्टेंबर 2025 रोजी केंद्रीय पुरातत्त्व विभागानं किल्ले रायगडावरील अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी नोटीस दिली होती. मात्र त्या कडे दुर्लक्ष करून बांधकाम करण्यात आलं. त्यामुळे शिवभक्तांच्या भावनांसोबत खेळ करणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई होणार की नाही, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
किल्ल्याचं पावित्र्य जतन करण्याची गरज
रायगड हा फक्त दगडी किल्ला नाही. तर स्वराज्य आणि स्वातंत्र्याचा संदेश देणारा तो अखंड ऊर्जा स्त्रोत आहे. बिकट परिस्थितीतही जिंकता येऊ शकतं, रयतेचं राज्य निर्माण करता येऊ शकतं हा विचार रायगडानं जगाला दिला. स्वराज्याची राजधानी असणारा आणि जिथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो रायगड मराठी माणसाचा मानबिंदू आहे. त्याच्या पावित्र्याला लावलेला धक्का हा महाराष्ट्राच्या अस्मितेसोबत करण्यात आलेला खेळ आहे. त्यामुळे हा खेळ थांबवून किल्ल्याचं पावित्र्य जतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
