निवडणूक चिन्ह आणि पक्षाबाबत ठाकरे गटाकडून सातत्याने सुप्रीम कोर्टाला तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली जात होती. या प्रकरणावर 20 ऑगस्टलाच सुनावणी होणार होती.परंतु, या खंडपीठातील न्यायमूर्ती सूर्यकांता हे अन्य प्रकरणात घटनापीठात असल्याने त्या सुनावणीमुळे शिवसेनेची सुनावणी लांबणीवर पडली होती. त्यानंतर आजच्या सुनावणीत कोर्टाकडून महत्त्वाचे निर्देश दिले जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, कोर्टाने 12 नोव्हेंबर ही सुनावणीची तारीख दिली.
advertisement
कोर्टातील सुनावणीनंतर अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले की, पक्ष आणि चिन्हाबाबतच्या महत्त्वाच्या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत दोन्ही बाजूंनी युक्तिवादासाठी वेळ मागितला असून, आता या प्रकरणावर 12 नोव्हेंबरपासून सविस्तर युक्तिवादाला सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे आपल्याला युक्तिवादासाठी फक्त 45 मिनिटे लागणार असल्याचे सांगितले. तर, समोरील पक्षकारांच्या वकिलांनी आम्हाला युक्तिवादासाठी 3 दिवस लागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आज न्यायालयाने तत्काळ सुनावणी दाखवण्याची तयारी दाखवली नाही. आज खंडपीठासमोर यापूर्वीच्या काही अर्धवट सुनावणी झालेली प्रकरणे होती. त्यामुळे त्यांनी त्या खटल्याला प्राधान्य दिले असावे असेही अॅड. सरोदे यांनी म्हटले.
अॅड. असिम सरोदे यांनी म्हटले की, “आम्हाला वाटत होतं की आजच अंतिम सुनावणी होईल. परंतु विरोधी पक्षाच्या वकिलांनी सांगितले की त्यांना तीन दिवस युक्तिवादासाठी लागतील. महापालिका निवडणुका जवळ आल्याने आम्ही सुनावणी लवकर घ्या अशी मागणी केली. त्यानंतर खंडपीठाने 12 नोव्हेंबर ही तारीख सुनावणीसाठी निश्चित केली. दरम्यान, या प्रकरणातील प्रतिवाद्यांनी डिसेंबरमध्ये सुनावणी घेण्याची मागणी केली होती.
12 नोव्हेंबर रोजी काय होणार?
अॅड. सरोदे यांनी सांगितले की, खंडपीठाने आता पुढील तारखेला सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. 12 नोव्हेंबरपासून युक्तिवाद सुरू होणार आहे. पहिल्यांदा अॅड. कपिल सिब्बल हे आपल्या युक्तिवादाला सुरुवात करतील. त्यानंतर विरोधी पक्षकाराकडून त्यांची बाजू मांडली जाईल. सु्प्रीम कोर्टाकडून पुढील सुनावणीत किती वेळ युक्तिवाद सुरू राहणार, याचेही निर्देश दिले जातील असेही सरोदे यांनी म्हटले.
सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?
आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. ठाकरे गटाच्यावतीने अॅड. कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितले की, जानेवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या प्रकरणावर तातडीने सुनावणी झाली पाहिजे. यावर न्या. सूर्यकांता यांनी पुढील सुनावणी दिवाळीनंतर होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता दिवाळीनंतर शिवसेना पक्षाच्या चिन्हावर सुनावणी होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना धनुष्य बाण हे प्रकरण अधिक महत्त्वाचे असणार आहे.