सात ठिकाणी होणार व्यापार केंद्रांची उभारणी
मुंबई महानगर प्रदेशातील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC), कुर्ला-वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर आणि विरार-बोईसर या सात ठिकाणी व्यापार केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. या केंद्रांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय कंपन्या, स्टार्टअप्स आणि उद्योगांना एक व्यापक प्लॅटफॉर्म मिळणार असून आर्थिक घडामोडींना मोठी चालना मिळेल.
मुंबईच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार
advertisement
या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्याच्या 140 बिलियन डॉलरवरून सन 2030 पर्यंत 300 बिलियन डॉलर आणि 2047 पर्यंत तब्बल 1.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. हे व्यापार केंद्र केवळ स्थानिक उद्योगांना नव्हे, तर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठीही मदत करणार आहेत.
आर्थिक विकासाला मिळणार गती
या व्यापार केंद्रांमुळे मुंबई आणि परिसरात रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणावर वाढेल.
स्टार्टअप आणि लघु-मध्यम उद्योगांना (SMEs) मोठा फायदा होईल, कारण त्यांना ग्लोबल कंपन्यांसोबत व्यापाराची संधी मिळेल. वाहतूक आणि पायाभूत सुविधांचा मोठा विकास होणार आहे, त्यामुळे महानगर प्रदेशाचा संपूर्ण आर्थिक आणि सामाजिक विकास वेगाने होईल.
सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना
राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेशाच्या वाढत्या व्यापारी महत्त्वाला ओळखून ही केंद्रे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्राचा आर्थिक गड आणखी मजबूत होणार असून, मुंबई ही भविष्यातील ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक राजधानी’ म्हणून ओळखली जाणार आहे. या प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशाचा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक नकाशावर ठसा उमटेल, आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला नवे परिमाण मिळेल.
