अमरावतीत 5 तारखेला होणाऱ्या आरएसएसच्या कार्यक्रमाचं सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई जाणार नाही हे आता अधिकृत पत्रातून त्यांनीच स्पष्ट केलं आहे. अमरावतीत 5 तारखेला RSS चा विजयादशमीच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून कमलताई गवई यांचं नावं समोर आलं. पण, मागील दोन दिवसांपासून संघाच्या निमंत्रणावरून वाद पेटला आहे. अखेरीस कमलाताई गवई यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून कार्यक्रमाला जाणार नसल्याचं जाहीर केलं.
advertisement
'या एका कार्यक्रमामुळे ते कलंकीत करण्याचा प्रयत्न होत असल्याने मी व्यथीत'
'माझं वय 84 असल्याने माझी प्रकृती बरी नाही. त्यामुळे आरएसएसच्या कार्यक्रमात मी जाणार नाही. माझे जीवन तर आंबेडकरी चळवळीला आणि विपश्यनेला वाहून घेतलं आहे. या एका कार्यक्रमामुळे ते कलंकीत करण्याचा प्रयत्न होत असल्याने मी व्यथीत व दुःखी झाली आहे. माझे वय ८४ असून माझी प्रकृती बरी नसल्याने डॉक्टराच्या सल्ल्याने सध्या उपचार घेत आहे. मी आंबेडकरी चळवळीला वाहून घेतले आहे पण मला एका कार्यक्रमामुळे कलंकित करण्याचा प्रयत्न केला. मी आरएसएस च्या कार्यक्रमात गेले असते तर आंबेडकरी विचारच मांडले असते, असं कमलताई गवई यांनी ठणकावून सांगितलं.
कमलताई गवई यांचं पत्र जसेच्या तसं!
दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२५ च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक पत्र समाजमाध्यमावर आणि वर्तमान पत्रामध्ये प्रकाशित झालं आहे. ते पत्र आमच्या कुटुंबाशी स्नेह असलेल्या कुणीतरी समाज बांधवाने लिहिलं असावं. त्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही. दिनांक ०५ ऑक्टोंबर २०२५ ला होणाऱ्या एका कार्यक्रमाची तारीख घेण्यासाठी माझ्या ओळखीतले काही लोक आले होते. आमच्या सर्वांप्रती मंगलभावना आणि मंगलकामना असतात. त्यामुळे आम्ही सर्वांचे स्वागतच करतो. आमचा मैत्रीभाव आणि बंधूभाव हा सर्वानी आहे.
परंतु, या कार्यक्रमाचे वृत्त प्रसारित झाल्याबरोबर अनेकांनी माझ्यावरच नव्हे तर स्मृतिशेष दादासाहेब गवई यांच्यावर सुद्धा टीकाच नव्हे तर दोषारोपण केले.
आम्ही पण आंबेडकरी विचाराला वाहून घेतले आहे. दादासाहेब गवई यांचे जीवन तर आंबेडकरी चळवळीलाच समर्पित होते. दुसऱ्या विचारधारेच्या मंचावर आपले विचार मांडणेही गरजेचं असतं. यासाठीही धाडस लागतं, सिंहाचं काळीज लागतं. दादासाहेब जाणून बुजून अशा विरोधी मंचावरती जायचे तिथे वंचितांचे प्रशन मांडायचे हा त्यांच्या धोरणाचा भाग होता. आपल्याशी असहमत असलेल्यांनाही ते आपली भूमिका ऐकवावी असं त्यांचे मत होतं. ते संघाच्या कार्यक्रमात गेले पण त्यांनी हिंदुत्व कधीही स्विकारलं नाही. त्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावरच भाषण केले. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानिक विचारांची मांडणी केली.
मी त्या विचार मंचावर गेले असते तरीही आंबेडकरी विचार आणि विपश्यनाच मांडली असती. स्मृतिशेष दादासाहेब याच विचाराने त्या विचारधारेच्या मंचावर गेले आणि तिथे त्यांनी आंबेडकरी विचारच मांडले. आपण कुठेही गेलो तरी आंबेडकरी विचारच मांडणार. ते आपण शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही. हा आपल्या संस्काराचा भाग आहे. तरीही माझ्यावर आणि स्मृतिशेष दादासाहेब गवई यांच्यावर ज्या पद्धतीने वस्तुस्थितीला धरुन नसलेली टीका झाली व अजुनही होत आहे. माझे जीवन तर आंबेडकरी चळवळीला आणि विपश्यनेला वाहून घेतलं आहे. या एका कार्यक्रमामुळे ते कलंकीत करण्याचा प्रयत्न होत असल्याने मी व्यथीत व दुःखी झाली आहे. माझे वय ८४ असून माझी प्रकृती बरी नसल्याने डॉक्टराच्या सल्ल्याने सध्या उपचार घेत आहे. कुठेतरी थांबले पाहिजे या कारणाने ०५ ऑक्टोंबरच्या कार्यक्रमात जाणार नाही एवढे खरे..
आता विसाव्याचे क्षण !
भरुन येते मन, भरुन येते मन.
मंगल हो !
(डॉ. कमल रा.गवई)
मंगल हो !