मुंबई: राज्यातील वैद्यकीय क्षेत्रावर परिणाम करणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सीईटी परीक्षेत शून्य पर्सेंटाइल गुण असले तरी आता प्रवेश मिळणार आहे. नर्सिंगच्या अभ्यासक्रमासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
महाविद्यालयांमधील रिक्त जागा भरता याव्यात यासाठी नर्सिंग प्रवेश परीक्षेतील किमान टक्केवारीची अट वगळण्याची परवानगी नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडियाने महाराष्ट्र सरकारला दिली आहे. त्यानंतर राज्याच्या सीईटी सेलने महाराष्ट्र नर्सिंग सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना शून्य पर्सेंटाइल मिळाले तरी बीएसएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास ते पात्र असणार असल्याचे म्हटले आहे.
advertisement
शून्य पर्सेंटाईलवर प्रवेश पण एका अटीवर!
सीईटी परीक्षेत शून्य पर्सेंटाइलवर नर्सिंगसाठी प्रवेश मिळणार असला तरी विद्यार्थ्यांना एक निकष पूर्ण करावा लागणार आहे. बारावीमध्ये पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) मध्ये किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. यापूर्वी, नियमांनुसार विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत किमान 50 टक्केवारीसह पीसीबीमध्ये 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि नर्सिंगच्या जागा रिक्त होण्यापासून रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे वृत्त 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिले आहे.
आरोग्यसेवेच्या गुणवत्तेत घसरण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, दुसरीकडे सरकारने अधिक विद्यार्थ्यांना कौशल्य-आधारित उच्च शिक्षण घेण्याची परवानगी देण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचा युक्तिवाद करण्यात येत आहे. नर्सिंग हा कौशल्य-आधारित व्यवसाय असल्याने, व्यावहारिक कौशल्ये केवळ प्रवेश परीक्षेतील गुणांपेक्षा जास्त महत्त्वाची असल्याचा मुद्दा समर्थनात मांडण्यात येत आहे.
नवीन नियम कधीपासून लागू?
हा नवीन सुधारीत नियम शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून लागू होईल. सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कमी सीईटी गुणांमुळे ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी नोंदणी केली नव्हती ते आता सीईटी सेलच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. ज्यांनी प्रक्रिया सुरू केली होती परंतु नोंदणी पूर्ण केली नव्हती त्यांनाही ती पूर्ण करण्यास सांगितले आहे.
खासगी नर्सिंग महाविद्यालयाला फायदा?
सीईटी टक्केवारी शून्यावर आणण्याच्या राज्याच्या निर्णयाचे खाजगी नर्सिंग कॉलेज चालकांकडून स्वागत करण्यात आले आहे. हा निर्णय खासगी नर्सिंग महाविद्यालयांच्या पथ्यावर पडणारा असल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्रात 200 हून अधिक महाविद्यालयांमध्ये बीएससी नर्सिंगच्या जवळपास 16,000 जागा असूनही, 7750 हून अधिक जागा रिक्त आहेत. जवळपास 50 टक्के जागा रिक्त राहत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता पर्सेंटाईलची अट शिथिल केल्याने अनेकांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.