सोलापूर आणि सांगली जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या तारखेत मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाटकातील प्रसिद्ध मायक्का चिंचली यात्रेमुळे मतदानावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत, ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीचा अहवाल मागवला आहे. सोलापूरमधील किसान आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनीदेखील मागणी केली आहे.
advertisement
नेमके प्रकरण काय?
येत्या ५ तारखेला कर्नाटकातील मायक्का चिंचली येथे मोठी यात्रा भरणार आहे. सोलापूर, सांगली जिल्ह्यातील लाखो भाविक या यात्रेसाठी दरवर्षी जात असतात. जर याच काळात निवडणुका झाल्या, तर मोठ्या संख्येने मतदार जिल्ह्याबाहेर असतील, ज्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर मोठा परिणाम होऊ शकतो. हीच बाब लक्षात घेऊन आमदार पडळकर यांनी निवडणूक आयोगाकडे मतदानाची तारीख बदलण्याची विनंती केली आहे.
प्रशासकीय हालचाली आणि नवा मुहूर्त
या मागणीनंतर निवडणूक आयोग सतर्क झाला असून त्यांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आता सांगलीत ८ फेब्रुवारीला मतदान होण्याची दाट शक्यता आहे.
राज्याच्या निकालावर होणार परिणाम?
सोलापूर, सांगलीची निवडणूक पुढे ढकलल्यास त्याचा परिणाम संपूर्ण राज्याच्या निकालावर होऊ शकतो. नियमानुसार, सर्व जिल्हा परिषदांचे मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय निकाल जाहीर करता येत नाहीत. त्यामुळे जर सांगलीत ८ तारखेला मतदान झाले, तर राज्यातील इतर सर्व जिल्हा परिषदांचे निकाल देखील लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
