दर 10 वर्षांनी केंद्र सरकार नवीन वेतन आयोग लागू करत असते. 7व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ डिसेंबर 2025 मध्ये संपत आहे. त्यामुळे नवीन वेतन आयोग 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार एप्रिल 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू करू शकते. याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
advertisement
या आयोगात सर्वात जास्त उत्सुकता आहे ती फिटमेंट फॅक्टरविषयी. 7व्या वेतन आयोगात 2.57 चा फिटमेंट फॅक्टर लागू केला गेला होता. मात्र, 8व्या वेतन आयोगात 2.86 ते 3.00 पर्यंत फिटमेंट फॅक्टर लावला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे. जर सरकारने फिटमेंट फॅक्टर 3.00 निश्चित केला, तर कर्मचारी वर्गाच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. काही अंदाजानुसार, किमान वेतन सध्या असलेल्या 32,000 रुपयांवरून थेट 51,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. यासोबतच, किमान निवृत्तिवेतनही 25,000 रुपयांपर्यंत वाढू शकते.
या वेतन आयोगामुळे केवळ मूळ पगारातच नव्हे, तर महागाई भत्ता (DA), HRA आणि इतर भत्त्यांमध्येही वाढ होईल. त्यामुळे एकूण मासिक उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, हे बदल लागू झाल्यास सर्व राज्यातील आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल. दरम्यान, सरकारने यासंदर्भात कोणताही अंतिम निर्णय किंवा अधिकृत अधिसूचना अद्याप प्रसिद्ध केलेली नाही. मात्र, आर्थिक वर्ष 2026 पासून नवीन वेतन आयोग लागू करण्याचा विचार सरकार करत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी ठरू शकते. आगामी काही महिन्यांत यासंबंधी स्पष्ट घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांनी थोडा धीर धरावा आणि अधिकृत घोषणांची वाट पहावी लागणार आहे. याबाबत सरकार अधिकृत घोषणा कधी करणार याची प्रतीक्षा आहे.
