पूर्णिया : काही जण नोकरी मिळाली नाही म्हणून निराश होतात. मात्र, काही जण असे असतात जे निराश न होता स्वत: नवीन सुरुवात करतात आणि त्यात यशस्वी होऊन दाखवतात. हे पुन्हा एकदा एका व्यक्तीने सिद्ध करुन दाखवले आहे. नोकरीचा शोध घेऊनही नोकरी न मिळाल्याने त्यांनी टोमॅटोची शेती केली आणि आज ते लखपती झाले आहेत. एकाच मोसमात ते लाखो रुपयांची कमाई करत आहेत.
advertisement
राजेश कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. ते बिहारच्या पूर्णिया येथील रहिवासी आहेत. शेती करणे हे फायद्याचे नाही असे काही जण आजही म्हणतात. काही प्रमाणात हे खरेही आहे. मात्र, जर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती केली तर तुमचे नशिब बदलू शकते. हे या शेतकऱ्याने सिद्ध करुन दाखवले आहे. मागील 4 वर्षांपासून ते टोमॅटोची शेती करत आहेत. तसेच प्रत्येक मोसमात ते मोठ्या प्रमाणात नफा कमावत आहेत.
नोकरी न मिळाल्याने घेतला मोठा निर्णय -
पूर्णिया येथील ठाढा गावाचे रहिवासी असलेले तरुण शेतकरी राजेश कुमार सांगतात की, बारावीच्या शिक्षणानंतर त्यांनी नोकरी शोधली. मात्र, त्यांना कुठेही रोजगार मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. मागील 4 वर्षांपासून ते टोमॅटोची शेती करत आहेत. त्यांनी पारंपरिक शेतीच्या तुलनेत आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर जोर दिला. तसेच त्यांचा हा निर्णय योग्य सिद्ध झाला. आता ते आपल्या लहानशा शेतात प्रत्येक मोसमात एकाच वेळी 7 लाख रुपयांची कमाई करत आहेत.
250 ग्रॅम एक टोमॅटो -
राजेश कुमार यांनी लोकल18 बोलताना सांगितले की, त्यांनी कटिहार येथून बियाणे मागवून एक एकरमध्ये टोमॅटोची शेती करायला सुरुवात केली. हा टोमॅटो करण या जातीचा आहे. एका झाडापासून 50 किलोपेक्षा जास्त टोमॅटो निघतात. तसेच झाड हे तीन महिने फळ देते. टोमॅटोची ही एक अशी जात आहे, ज्यामध्ये कमी मेहनत आणि खर्चात चांगल्या प्रकारचा फायदा होतो. एका टोमॅटोचे वजन 250 ग्रॅम असल्याचेही त्यांनी सांगितले.
दररोज निघते इतके उत्पादन -
राजेश यांनी सांगितले की, ते आपल्या शेतातून रोज 5 ते 7 क्विंटल टोमॅटो काढतात आणि बाजारात विकतात. एका रोपातून सुमारे 50 किलो उत्पादन निघते. यामुळे एका हंगामात त्यांना 7 लाखांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. आजूबाजूच्या अनेक तरुणांनी त्यांच्या शेती पद्धतीमुळे प्रभावित होऊन शेती करण्यास सुरुवात केली आहे.
ऑफ सिझनमध्ये या पिकाचे उत्पादन -
राजेश सांगतात की, भाजीपाल्याची शेती जरा कठीण आहे. मेहनत आणि औषधींवर जास्त खर्च येतो. सुरुवातीला मला तोटा झाला. मात्र, मी हार मानली नहाी. आता मी ऑफ सीझनमध्ये बटाटा, मुळा, कोबी, टोमॅटो, कोथिंबीर, पालक, वांगी आणि गाजरसह इतर भाजीपाल्याची शेती करतो. बाजारात व्यापारी 3 हजार ते साडेतीन हजार प्रतिक्विंटल दराने व्यापारी येऊन खरेदी करतात. त्यामुळे यातून मला चांगला नफा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.