सातारा: भारतात पूर्वीपासूनच गोपालन हा प्रमुख शेतीपूरक व्यवसाय राहिला आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसोबतच शेतीसाठी गोवंश ग्रामीण जीवनाचा भाग राहिला आहे. सध्याच्या काळात अधिक दूध मिळवण्यासाठी जर्सी किंवा इतर परदेशी जातींच्या गाई पाळल्या जातात. तरीही देशी गाईंचे खास आकर्षण अजूनही कायम आहे. जगात उंचीला सर्वात लहान असणारी देशी पुंगनूर गाय सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरतेय. सातारा जिल्ह्यातील कराडच्या कृषी प्रदर्शनात या गाईला पाहण्यासाठी मोठी गर्दी होतेय.
advertisement
उंचीला सर्वात लहान गाय
महाराष्ट्रासह देशामध्ये गाईंच्या विविध जाती प्रजाती आढळतात. याच गाईंच्या प्रजातीमध्ये सर्वात कमी उंचीची गाय म्हणून पुंगनूर गाईंना ओळखले जाते. तसेच ही गाय पौष्टिक दुधासाठी प्रसिद्ध आहे. या गाईने सातारा जिल्ह्यातील कराड येथे झालेल्या कृषी प्रदर्शनामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या गाईचे मालक एस. रामू यांनी गाईबाबत माहिती दिली आहे.
जवानाने सीमेवर 17 वर्ष दिली सेवा! गावाकडे आल्यावर असा केला प्रयोग, सगळेच अवाक, Video
कशी आहे पुंगनूर गाय?
पुंगनूर ही शुद्ध भारतीय वंशाची गाय आहे. हा गोवंश जगात सर्वात कमी उंचीचा मानला जातो. ही गाय 2 ते 3 फूट उंचीची असते. पांढरा, काळा, तांबडा अशा रंगांमध्ये ही गाय आढळते. या गाईचे पाय अखूड असतात. मात्र एक वेगळं वैशिष्ट्य सांगायचं तर या गाईची शेपटी जमिनीला टेकेल एवढे असते, असे रामू सांगतात.
पाळणूक करणे सोयीचे
या गाईचे वजन 120 किलो ते 200 किलो पर्यंत असते. गाईची पाळणूक करणे अगदी सोयीची असते. कारण गाय लहान असल्याने विशिष्ट गोठा किंवा वेगळी व्यवस्था करावी लागत नाही. तसेच आहार देखील कमी लागतो. यामध्ये ओला चारा किंवा सुख्या चाऱ्यामध्ये या गाईचे संगोपन करता येते. त्यामुळे दुष्काळग्रस्त गावांमध्येही या गाईचं पालन पोषण करता येतं. दररोज गूळ आणि दोन लिटर पाणी गाईला द्यावे लागते.
शिवरायांनी पाडली होती सोन्याची नाणी, हा दूर्मिळ ठेवा पाहिलात का?
300 रुपये लिटर दूध
या गाईंचा आहार कमी असला तरी तिचे दूध हे पौष्टिक, सकस असते. सकाळी 2 लिटर आणि संध्याकाळी 2 लिटर दूध ही गाय देते. गाईच्या दुधाची पौष्टिकता आणि दुधात दाट पणा जास्त असतो. त्यामुळे दुधाचे फॅट जास्त प्रमाणात भरते आणि प्रति लिटर 300 रुपये प्रमाणे ते बाजारात विकले जाते. या गाईची किंमत 2 ते 5 लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त आहे. भारतात प्रामुख्याने हैदराबाद, तिरुपती बालाजी, आंध्र प्रदेश, चेन्नई आणि तमिळनाडू येथे या गाई पाहायला मिळतात.