धाराशिव : अगदी आता-आतापर्यंत शेतकऱ्याच्या लेकाला कुणी मुलगी द्यायला तयार व्हायचं नाही. शेती म्हणजे उत्पन्नाचा काहीच भरवसा नाही, असंच वाटायचं. परंतु आता मात्र शेतकरी बांधवांनी ही परिस्थिती बऱ्यापैकी बदललीये. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी आज जमिनीत विविध प्रयोग करून महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल करतात. उच्च पदाच्या नोकरीत जेवढा पगार मिळणार नाही, तेवढं उत्पन्न शेतीतून मिळू शकतं हे अनेक प्रगतशील शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवलंय.
advertisement
धाराशिवच्या कळंब तालुक्यातील नायगावचे शेतकरी मनोज शितोळे हेदेखील यापैकीच एक. ते वांग्याच्या शेतीतून लाखोंची कमाई करतात. पदवीधर झाल्यानंतर त्यांनी नोकरी शोधायला सुरूवात केली. परंतु नोकरी काही मिळेना. शेवटी त्यांनी वडिलोपार्जित शेती करायचं ठरवलं. जमीन होती फक्त अडीच एकर. त्यात त्यांनी आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला.
पोखरा इथून पॉलिहाऊस आणि नेट हाऊसचा लाभ घेऊन त्यांचा अत्याधुनिक शेतीचा प्रवास सुरू झाला. सुरूवातीलाच त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं. त्यांनी मे महिन्यात भरीत वांग्याची लागवड केली. 1 एकर क्षेत्रावर 3200 भरीत वांग्याच्या रोपं त्यांनी लावली.
योग्य नियोजन आणि मशागतीमुळे त्यांना उत्तम आर्थिक उत्पन्न मिळालं. आता त्यांनी 13 टन वांग्याची विक्री केली आहे. तर, आणखी 25 ते 30 टन वांग्याचं उत्पादन मिळण्याची अपेक्षा त्यांना आहे. 20 ते 30 रुपये प्रति किलो दरानं ते वांग्याची विक्री करतात, त्यातून त्यांना अगदी मनासारखं लाखोंचं उत्पन्न मिळतं.