धाराशिव : महाराष्ट्रात 2016च्या खरिप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येते. पीक विमा योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना काही गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज केला याचा अर्थ तुम्ही लाभ मिळवण्यास पात्र ठरलात असं नाही. तर तुमच्या शेतमालाचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत विमा कंपनीला माहिती देणं आवश्यक असतं.
advertisement
मग विमा कंपनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच पीक विमा योजनेच्या नियमानुसार तुम्ही लाभार्थी म्हणून पात्र आहात का हे ठरवलं जातं. त्यानंतरच नुकसान भरपाई दिली जाते. नुकसानाबाबत विमा कंपनीला माहिती देण्यासाठी सरकारकडून 4 मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ते नेमके कोणते, पाहूया.
इन्शुरन्स ॲपवरून आपण माहिती देऊ शकता. इथं नुकसानाचे फोटो, व्हिडीओ अपलोड करण्याची सुविधा असते. तसंच राज्य सरकारकडून जाहीर केलेल्या 14 447 या क्रमांकावर संपर्क साधून नुकसानाबाबत माहिती देऊ शकता. हे शक्य नसल्यास विमा कंपनीच्या ईमेलवर मेल करून पूर्व सूचना देऊ शकता. यापैकी तीनही पर्याय शक्य नसल्यास कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन आपण नुकसानाबाबत माहिती देऊ शकता. परंतु 72 तासांच्या आत हे काम व्हायला हवं.
दरम्यान, शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या पिकाचा आणि लागवड असलेल्या क्षेत्राचाच विमा उतरवावा. विमा घेतलेलं पीक प्रत्यक्षात शेतात आढळलं नाही तर विमा अर्ज नामंजूर करण्यात येतो.