सोलापूर : आपला भारत देश कृषीप्रधान आहे. इथं पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन चांगलं पीक घेतलं जातं. आजकाल अनेक प्रगतशील शेतकरी आपल्या जमिनीवर विविध प्रयोग करून उत्तम उत्पन्न मिळवतात. तसंच शेतीपूरक व्यवसायातूनही चांगली कमाई होते. विशेष म्हणजे सेंद्रिय शेतीवर आता मोठा भर दिला जात असल्यामुळे शेणखतविक्रीसुद्धा उत्पन्नाचं उत्तम साधन झालं आहे.
advertisement
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता घसरत चाललीये. त्यामुळे अनेक शेतकरीबांधव आता सेंद्रिय शेती, जैविक शेती करण्यावर भर देतात. त्यासाठी शेणखताचा प्रामुख्यानं वापर होतो. परंतु यांत्रिकीकरणामुळे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या अशा पशूधनात सध्या घट होत असल्यानं शेणखताला सोन्याचा भाव आलाय.
हेही वाचा : सावकाराच्या तावडीतून जमीन सोडवण्यासाठी काय कराल? गप्प बसू नका, तक्रार करा!
पूर्वी गावशिवारात सहज मिळणाऱ्या शेणखतासाठी आता पैसे मोजावे लागतात. सोलापुरात 1 ब्रास शेणखत 3 ते 4 हजार रुपयांना विकलं जातं. सिद्धेश्वर कारखान्याजवळ शेतकरी गणेश सोनकडे यांनी आपल्या शेतात सेंद्रिय पिकांची लागवड केलीये. त्यांच्या गोठ्यात तब्बल 70 ते 90 मुर्रा प्रजातीच्या म्हशी आहेत. त्यांच्यापासून मिळणाऱ्या शेणाची ते शेणखत म्हणून विक्री करतात. पूर्वी हजार ते दीड हजार रुपये ट्रॅक्टर-ट्रॉली या दरानं शेणखत मिळत होतं. ते आता 3 ते 4 हजार रुपयांना मिळतं. परिणामी गणेश सोनकडे हे वर्षभरात केवळ शेणखतविक्रीतून 5 ते 6 लाख रुपयांची उलाढाल करतात. त्याचबरोबर म्हशींपासून दररोज 250 ते 300 लिटर दूधविक्री होते.
शेणखतापासून फायदा काय :
गुरांचं शेण, मूत्र, शेतातला पालापाचोळा, पिकांचे अवशेष, शहरातील कुजण्यायोग्य तत्सम सेंद्रिय पदार्थ जैविकरीत्या कुजवून सेंद्रिय खतं तयार होतात. या खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते, शिवाय केमिकलमुक्त धान्य मिळाल्यामुळे त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही.
शेणखतात वनस्पतींना उपयुक्त नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, जस्त, लोह, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्य असतात. ही अन्नद्रव्य वनस्पतींच्या मुळाद्वारे हळूहळू पिकांना उपलब्ध होत असल्यामुळे वाढीच्या काळात पिकांना सतत अन्न मिळतं.