आयशा आणि नेहा या दोघीही उच्चशिक्षित आहेत. आयशाचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे, तर नेहा पदव्युत्तर आहे. शिक्षणाप्रमाणेच या दोघी नामांकित कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत देखील होत्या. मात्र, दुसऱ्यांकडे काम करण्यापेक्षा स्वतःचे काहीतरी सुरू करावे आणि आपली वेगळी ओळख निर्माण करावी, हे स्वप्न त्या उराशी बाळगून होत्या. अखेर त्यांना ती संधी मिळालीच.
advertisement
या दोघी बहिणी सांगतात की, त्यांच्या समाजाच्या मंदिरात एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान ट्रस्टकडून त्यांना व्यवसाय करण्याची एक छोटी संधी मिळाली. या कार्यक्रमात त्यांनी कोरियन ड्रिंक्सचा स्टॉल लावला. या स्टॉलला लोकांनी अनपेक्षित आणि भरभरून प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, कार्यक्रम संपल्यानंतरही अनेक ग्राहकांकडून त्यांच्या ड्रिंक्सची मागणी होऊ लागली.
तुम्ही आम्हाला हे ड्रिंक्स कायमस्वरूपी उपलब्ध करून द्या,अशी लोकांची मागणी वाढू लागली. तिथेच आयशा आणि नेहा यांना समजले की, हीच त्यांच्यासाठी व्यवसायाची उत्तम संधी आहे. लोकांचा प्रतिसाद पाहून त्यांनी नाशिक रोड परिसरात बोबा जंक्शन या नावाने आपला अधिकृत व्यवसाय सुरू केला.
सुरुवातीला, मुली व्यवसाय करू शकतील का? अशी भीती आणि प्रश्न घरच्यांच्या मनात होते. परंतु, आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने अवघ्या काही महिन्यांतच त्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या यशातून दिले. आज आयशा आणि नेहा यांनी आपल्या चांगल्या पगाराच्या नोकरीला रामराम ठोकला असून, त्या पूर्णवेळ आपला व्यवसाय सांभाळत आहेत. विशेष म्हणजे, ज्या घरच्यांना सुरुवातीला काळजी वाटत होती, तेच आता त्यांना व्यवसायात मोठी मदत करतात. आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून त्या केवळ स्वतःचीच नव्हे, तर आपल्या कुटुंबीयांची स्वप्ने देखील पूर्ण करत आहेत.