केंद्र सरकारकडून गिग कामगारांसाठी आरोग्य विमा योजना देखील सुरू करणार आहे. त्याचा फायदा लाखो कामगारांना होणार आहे. अॅप आधारीत फूड डिलीव्हरी, सेवा देणाऱ्या कर्मचारी-कामगारांची सेवा मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या गिग वर्कर्सच्या सामाजिक सुरक्षितेचा मुद्दा वारंवार अधोरेखित करण्यात येत होता. या गिग वर्कर्सना पंतप्रधान जन आरोग्य योजने अंतर्गत आरोग्य विमा मिळणार आहे. अर्थसंकल्पात पंतप्रधान स्वानिधी योजनेतील कर्ज मर्यादाही वाढवण्यात आली आहे.
advertisement
गिग कामगारांव्यतिरिक्त, अर्थमंत्र्यांनी सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी काही घोषणा देखील केल्या. मंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, कर्जाची उपलब्धता सुधारण्यासाठी, क्रेडिट गॅरंटी कव्हर वाढवले जाईल. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी 5 कोटी रुपयांवरून 10 कोटी रुपये, जे पुढील 5 वर्षांत 1.5 लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज प्रदान करण्यात येणार आहे.
आत्मनिर्भर भारतासाठी महत्त्वाच्या असलेल्या 27 क्षेत्रांमध्ये, स्टार्टअप्ससाठी 10 कोटी रुपयांपासून 20 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी हमी शुल्क 1 टक्क्यापर्यंत कमी करण्यात येत असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.
विरोधकांकडून गदारोळ....
लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी बाकांवरून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू झाली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची सूचना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना केली. त्याच दरम्यान विरोधी बाकांवरून महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या मुद्यावरून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहता लोकसभा अध्यक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बोलण्यास वेळ दिला जाईल, असे सांगितले. त्यानंतरही सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू होती. केंद्र सरकार हिंदूविरोधी असल्याची घोषणाबाजी विरोधकांच्या बाकांवरून सुरू झाली. विरोधकांच्या गदारोळातच निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषण सुरू केले. काही वेळेनंतर विरोधकांनी घोषणाबाजी थांबवली.
