केंद्रीय नागरी सेवा नियम 54 ही एक सामाजिक कल्याण योजना आहे. या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पती/पत्नी किंवा मुलांना आर्थिक मदत दिली जाते. यासंबंधीत अनेकांना असा प्रश्न आहे की मुलीचा तिच्या वडिलांच्या पेन्शनवर हक्क आहे का?
नियम 54 अन्वये निवृत्तीवेतन मिळण्याचा अधिकार कोणाला आहे?
नियम 54 अन्वये निवृत्तीवेतनधारकाचा मृत्यू झाल्यानंतर खालील नातलगांना निवृत्तीवेतन मिळण्याचा अधिकार आहे.
advertisement
- निवृत्तीवेतनधारकाचा जोडीदार (पती/पत्नी)
- निवृत्तीवेतनधारकाची मुलं
- निवृत्तीवेतनधारकाचे पालक
- निवृत्ती वेतनधारकाचे दिव्यांग भाऊ किंवा बहीण
मुलीला मिळू शकते का फॅमिली पेन्शन?
निवृत्तीवेतनधारकाच्या मुलीला आई किंवा वडिलांचे निवृत्ती वेतन मिळू शकते का, असा प्रश्न कायम विचारला जातो. होय, असं त्याचं उत्तर आहे. केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम 2021 नुसार, अविवाहित, विवाहित आणि विधवा मुलगी फॅमिली पेन्शनची हक्कदार आहे. या नियमानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांच्या फॅमिली पेन्शनसाठी पात्र असलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या यादीतून मुलीचे नाव वगळता येत नाही. फॅमिली पेन्शन मिळण्यासाठी मुलीचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. कुटुंबातील सर्व मुलांचे वय देखील 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि त्यांच्याकडे रोजगाराचं कोणतंही साधन नसावं.
मुलगी कधीपर्यंत असते पात्र?
जोपर्यंत विवाह होत नाही, तिला नोकरी मिळत नाही किंवा तिला मानसिक आणि शारीरिक अपंगत्व नसेल तोपर्यंत मुलगी फॅमिली पेन्शनसाठी पात्र असते. जर एखाद्या व्यक्तीचे आई किंवा वडील सरकारी नोकरीत असतील आणि त्यांची मुलगी अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा असेल, तर या कर्मचाऱ्याच्या पश्चात त्यांची मुलगी निवृत्तीवेतनसाठी पात्र ठरते.
कोणत्या स्थितीत आयुष्यभर पेन्शन मिळते?
जर सरकारी कर्मचाऱ्याने त्यांच्या मुलीचे नाव फॉर्म क्र.4 मध्ये समाविष्ट केले असेल तर तिला अधिकृतपणे कुटुंबाची सदस्य मानले जाते. जर मुलगी मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग असेल तर तिला आयुष्यभर निवृत्तीवेतन मिळू शकते. तसेच विधवा किंवा घटस्फोटित मुलीला आयुष्यभर फॅमिली पेन्शन मिळते. जर घरात एखादं अपत्य दिव्यांग असेल तर त्याला निवृत्तवेतनाचा प्रथम हक्क मिळतो.
अविवाहित मुलींसाठी काय आहे नियम ?
केंद्र सरकारने फॅमिली पेन्शनसाठी पात्र अविवाहित मुलींकरिता काही नियम निश्चित केले आहे. यात अविवाहित, विधवा किंवा घटस्फोटित मुलगी फॅमिली पेन्शनसाठी कशी आणि कोणत्या राज्यात पात्र आहे, ते नमूद आहे. सर्व अविवाहित आणि विधवा मुली फॅमिली पेन्शनसाठी पात्र आहेत. जर मुलीच्या घटस्फोटाचा हुकूम मंजूर झाला असेल तर निवृत्तीवेतनधारक वडिलांची मुलगी फॅमिली पेन्शनसाठी पात्र ठरते.
अविवाहित मुलीसाठी पात्रता
नियम 54 च्या उपनियम 6 (iii) अन्वये, अविवाहित मुलीचे लग्न होईपर्यंत किंवा तिला स्वतःचे उत्पन्न मिळत नाही तोपर्यंत ती पूर्ण फॅमिली पेन्शनसाठी पात्र आहे.
भावंडांत सर्वांत मोठी : जर एक अविवाहित मुलगी भावा-बहिणींमध्ये सर्वात मोठी असेल, तर तिला आई-वडिलांच्या पश्चात फॅमिली पेन्शन मिळू शकते.
जुळी मुलं असतील तर: जर जुळ्या अविवाहित बहिणी असतील तर निवृत्तीवेतनाची रक्कम दोघांमध्ये समान वाटप होते.
दोन पेन्शन : जर आई आणि वडील दोघेही पेन्शन योजनेशी संलग्न असतील तर मुलीला देखील दोघांचे निवृत्ती वेतन मिळते. पण दोन्ही फॅमिली पेन्शनची रक्कम दरमहा 1,25,000 रुपयांपेक्षा जास्त नसावी.
उत्पन्न : जर अविवाहित मुलगी योजनेची लाभार्थी असेल, तर पहिले निवृत्ती वेतन तिचे उत्पन्न मानले जाणार नाही.
दत्तक घेतलेले मूल : जर अविवाहित मुलगी पती किंवा पत्नीने दत्तक घेतलेली मुलगी असेल तर फॅमिली पेन्शन नाकारली जाऊ शकते.
दिव्यांग मुलगी : जर मुलगी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दिव्यांग असेल तर अशा परिस्थितीत तिला आयुष्यभर किंवा वयाच्या 25 वर्षापर्यंत पेन्शन मिळू शकते.
घटस्फोटित आई-वडील : जर अविवाहित मुलीच्या मृत आई-वडिलांनी घटस्फोटासाठी याचिका दाखल केली असेल किंवा त्यांचा घटस्फोट झाला असेल तर अशा स्थितीत अविवाहित मुलगी फॅमिली पेन्शनसाठी पात्र ठरते.