मुंबई: नवीन वर्ष सुरू होऊन अजून पहिला महिना संपलेला नसताना जागतिक कॉर्पोरेट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर नोकरी कपातीच्या घोषणा येऊ लागल्या आहेत. 2025 मध्ये दिसलेली Layoffsची लाट 2026 मध्येही कायम असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
advertisement
Meta, Citigroup आणि BlackRock या जगातील आघाडीच्या कंपन्यांनी वेगवेगळ्या विभागांतून हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ताज्या घडामोडीनुसार, BlackRock ने जानेवारी महिन्यातच शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली आहे.
Meta मध्ये मोठी कपात; Reality Labs वर गंडांतर
मार्क झुकरबर्ग यांच्या नेतृत्वाखालील Meta कंपनीने आपल्या Reality Labs विभागातील सुमारे 10 टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. ही कपात कंपनीच्या पुनर्रचना प्रक्रियेचा भाग असून, व्हर्च्युअल रिअॅलिटीवरील खर्च कमी करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि AI-आधारित वेअरेबल्सकडे गुंतवणूक वळवण्याचा Meta चा प्रयत्न आहे.
गेल्या वर्षीच झुकरबर्ग यांनी Reality Labs मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना खर्च कपातीचे पर्याय शोधण्याचे निर्देश दिले होते. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून ही कारवाई पाहिली जात आहे.
Citigroup मध्ये 1,000 कर्मचाऱ्यांची कपात
जागतिक बँकिंग क्षेत्रातील दिग्गज Citigroup या आठवड्यात सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जेन फ्रेझर यांच्या नेतृत्वाखाली खर्च नियंत्रण आणि नफाक्षमता वाढवण्यावर भर दिला जात आहे. कंपनीकडे सप्टेंबरअखेर सुमारे 2.27 लाख कर्मचारी होते. सध्याची कपात ही दोन वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या 2026 अखेरपर्यंत 20,000 नोकऱ्या कमी करण्याच्या व्यापक योजनेचा भाग आहे.
Citigroup ने स्पष्ट केले की, “2026 मध्येही कर्मचारी संख्या कमी करण्याची प्रक्रिया सुरू राहील.” तंत्रज्ञानामुळे मिळालेली कार्यक्षमता, व्यवसायाच्या गरजांनुसार कर्मचारी रचना बदलणे आणि सुरू असलेल्या ट्रान्सफॉर्मेशन प्रक्रियेचा हा भाग असल्याचे बँकेने म्हटले आहे. फ्रेझर यांनी 2021 मध्ये सूत्रे हाती घेतल्यानंतर Citigroup ने अनेक देशांतील रिटेल बँकिंग व्यवसायातून माघार घेतली आहे.
BlackRock मध्ये शेकडो नोकऱ्यांवर गदा
जगातील सर्वात मोठी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी BlackRock नेही नोकरी कपातीची घोषणा केली आहे. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येच्या सुमारे 1 टक्का म्हणजेच अंदाजे 250 कर्मचारी या निर्णयामुळे प्रभावित होणार आहेत.
BlackRock च्या प्रवक्त्याने सांगितले, “कंपनी अधिक सक्षम बनवणे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आमची उद्दिष्टे आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन संसाधनांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.” ही कपात अशा वेळी होत आहे, जेव्हा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी BlackRock ला अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट्सकडे अधिक आक्रमकपणे वळवत आहेत.
2026 ची सुरुवातच अस्थिरतेने
2025 मध्ये टेक आणि फायनान्स क्षेत्रात दिसलेली नोकरी कपातीची भीती 2026 मध्येही कायम राहणार असल्याचे संकेत या घडामोडींमधून मिळत आहेत. AI, खर्च कपात आणि पुनर्रचना हेच आता कॉर्पोरेट निर्णयांचे केंद्रबिंदू ठरत आहेत.
