का घसरले सोन्याचे भाव?
आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन मध्यवर्ती बँक 'फेड'ने व्याजदर चढे ठेवण्याचे धोरण कायम ठेवले आहे. तसेच इराण युद्धाचा ताण जागतिक सुवर्ण बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे. डॉलरचा दर वधारल्याने सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचे म्हटले जात आहे.
सोन्याबाबत ४३ वर्षात पहिल्यांदाच घडलं...
सोन्याच्या जागतिक आणि भारतीय बाजारपेठेत सध्या मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या किमतीत तब्बल १० टक्क्यांची घट झाली आहे. ही १९८३ नंतरची म्हणजेच गेल्या ४३ वर्षांतील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण ठरली आहे. जानेवारी २०२६ मध्ये सोन्याने उच्चांक गाठला होता, मात्र त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत किमती २० ते २५ टक्क्यांनी कोसळल्या आहेत.
advertisement
भारतीय बाजारपेठेचा विचार केला तर जानेवारीपासून आतापर्यंत सोने १६ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. २९ जानेवारी २०२६ रोजी सोन्याने जो उच्चांक गाठला होता, त्या तुलनेत आता किंमत २८,६०७ रुपयांनी कमी झाली आहे. २०२५ मध्ये सोन्यात ७५ टक्क्यांची मोठी वाढ झाली होती, मात्र आता हे चित्र पूर्णपणे पालटले आहे.
पुढील तीन महिन्यानंतर काय होणार?
अॅक्सिस म्युच्युअल फंड आणि बीएमआय (BMI) च्या अहवालानुसार, नजीकच्या भविष्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता धुसर आहे. जून २०२६ पर्यंत सोन्याच्या किमती दबावाखालीच राहतील, असा विश्लेषकांचा अंदाज आहे. सध्या बाजारात 'बार्गेन बाइंग' म्हणजेच स्वस्त दरात खरेदी करण्याचे संकेत मिळत असले, तरी गुंतवणूकदारांनी सावध राहणे गरजेचे आहे.
खरेदी करावी की प्रतीक्षा?
सध्या आरबीआय (RBI) आणि आशियाई देशांच्या मध्यवर्ती बँका सोने खरेदी करत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. मात्र, किमती पुन्हा वाढतील या आशेने आताच मोठी गुंतवणूक करणे धाडसाचे ठरू शकते, असे एक्सपर्टने म्हटले. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही वेळ चांगली असली तरी, किमती स्थिर होईपर्यंत मोठी खरेदी टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
(Disclaimer : ही वाचकांच्या माहितीसाठी असून कोणत्याही प्रकारे खरेदी-विक्रीचा सल्ला नाही. सोनं खरेदी, गुंतवणूक ही आर्थिक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावे.)
