जागतिक पातळीवर असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या दरात मागील काही दिवसांमध्ये चार ते पाच हजारांनी वाढ झाली आहे. 95-96 हजार रुपये प्रति तोळा विक्री होणारं सोनं आता आता जीएसटीसह एक लाख एक हजार रुपये प्रति तोळा या भावाने विक्री होत आहे. तर चांदी देखील प्रति किलो एक लाख 8 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
advertisement
Women Success Story: व्यवसाय करण्यासाठी नोकरी सोडली, बनवला ज्वेलरी ब्रँड, महिन्याला 1 लाखांची कमाई
रशिया-युक्रेन दरम्यान सुरू असलेले दीर्घकालीन युद्ध, त्याचबरोबर इराण, इस्त्राईल आणि अमेरिका या तीन देशांदरम्यान सुरू असलेला संघर्ष यामुळे जागतिक बँका सोने खरेदी करत आहेत. या चढाओढीमुळे देखील सोन्याचे दर वाढले असल्याचे जालना सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीधर लाल लधानी यांनी सांगितले.
ग्राहकांनी निवडला हा पर्याय
सोने हे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानले जाते, त्यामुळे प्रत्येक देशाच्या जागतिक बँका या सोन्यामध्ये अधिकची गुंतवणूक करत आहेत. तर दुसरीकडे ग्राहकांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, ग्राहक नवीन दागिने खरेदी करण्यापेक्षा जुने दागिने घेऊन येऊन त्या बदल्यात नवीन दागिने घेऊन जात असल्याचा कल पाहायला मिळत आहे. सध्या 30 ते 40 टक्के ग्राहक हे जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन दागिने घेऊन जात आहेत, असेही लाधानी सांगतात.
युद्धजन्य परिस्थिती कायम राहिली तर सोन्याचे दर 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. तर हीच परिस्थिती विरुद्ध झाली तर मात्र सोन्याचे दर 90 हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत खाली येऊ शकतात, अशी शक्यता गिरीधरलाल लाधानी यांनी व्यक्त केली.