नवी दिल्ली : जीएसटी दरांमध्ये कपात सोमवारी लागू होताच देशभरातील ऑटो शोरूममध्ये अक्षरशः सणासारखे वातावरण पाहायला मिळाला. नवरात्रीच्या शुभारंभीसोबतच नव्या कर व्यवस्थेने बाजारात असा उत्साह निर्माण केला की वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी अनेक वर्षांचे विक्री रेकॉर्ड मोडीत काढले. यामध्ये विशेषतः मारुती आणि हुंडई या दोन कंपन्यांसाठी सोमवारचा दिवस सर्वात यशस्वी ठरला. दोन्ही कंपन्यांनी एका दिवसातच विक्रीचा नवा उच्चांक गाठला.
advertisement
मारुती सुजुकीची जबरदस्त झेप
मारुती सुजुकी इंडियाने सांगितले की- सोमवार संध्याकाळपर्यंत त्यांच्या किरकोळ विक्रीचा आकडा 25 हजारांवर पोहोचला असून दिवसअखेर तो 30 हजारांच्या पुढे जाईल असा अंदाज आहे. कंपनीचे सेल्स आणि मार्केटिंग प्रमुख पार्थो बनर्जी यांनी सांगितले की सुमारे 80 हजार ग्राहकांनी डिलरशिपवर चौकशी केली आणि लहान कार मॉडेल्सच्या बुकिंगमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ नोंदली गेली.
हुंडईने पाच वर्षांचा विक्रम केला
हुंडई मोटर इंडियाचे सीओओ तरुण गर्ग यांनी माहिती दिली की- कंपनीने पहिल्याच दिवशी 11 हजार गाड्यांची विक्री केली. जो गेल्या पाच वर्षांतील सर्वात मोठा आकडा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जीएसटी सुधारणांमुळे आणि नवरात्रीच्या सुरुवातीमुळे बाजारात जबरदस्त सकारात्मकता आली असून ग्राहकांचा विश्वास आणखी वाढला आहे.
लहान कारांना मोठा फायदा
सरकारने लहान कारवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून थेट 18 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. या निर्णयामुळे 1,200 सीसीपर्यंतच्या पेट्रोल, डिझेल, हायब्रिड, सीएनजी आणि एलपीजी कारच्या किंमती 40 हजारांपासून तब्बल 1.2 लाख रुपयांपर्यंत स्वस्त झाल्या आहेत. किंमती कमी झाल्याने अनेक ग्राहक आता उच्च श्रेणीतील कार घेण्याचा विचार करत आहेत.
वितरक आणि संघटनांची प्रतिक्रिया
गेल्या काही आठवड्यांपासून ग्राहकांचा उत्साह सातत्याने वाढत होता आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी त्याचे स्पष्ट दर्शन झाले. करसुधारणा हा फक्त हंगामी फायदा नसून येत्या काही वर्षांत संपूर्ण उद्योगाला नवी गती देणार असल्याचे त्यांनी नमूद केले, असे फाडा (FADA) चे अध्यक्ष सी. एस. विग्नेश्वर यांनी सांगितले. तर सियाम (SIAM) चे महासचिव राजेश मेनन यांनीही हे पाऊल ऑटो क्षेत्रासाठी मोठा बूस्ट असल्याचे म्हटले.
ऑनलाइन विक्रीतही उछाल
ऑनलाइन प्लॅटफॉर्म कार्स२४ (Cars24) ने दावा केला की- नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुपारपर्यंतच त्यांच्या डिलिव्हरीमध्ये तब्बल 400 टक्क्यांची विक्रमी वाढ झाली. सर्वाधिक विक्री दिल्ली-एनसीआरमध्ये झाली. त्यानंतर अहमदाबाद, बेंगळुरू, पुणे आणि मुंबईचा क्रमांक लागतो. दरम्यान होंडा कार्स इंडियानेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिसेंबरपर्यंत जीएसटी लाभासह आपले मॉडेल्स स्ट्रॅटेजिक प्राइसिंगने बाजारात आणले आहेत.