मुंबई: दिवाळीपूर्वी देशभरात लक्झरी कार्स खरेदीचा ट्रेंड झपाट्याने वाढताना दिसतोय. सणासुदीच्या या काळात नव्या गाडीची खरेदी शुभ मानली जाते आणि याच पार्श्वभूमीवर जैन समुदायाने आपली आर्थिक ताकद प्रभावीपणे दाखवून दिली आहे. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) च्या पुढाकाराने तब्बल 186 हाय-एंड लक्झरी कार्स बीएमडब्ल्यू, ऑडी आणि मर्सिडीजसारख्या सामूहिकरीत्या खरेदी करून 21 कोटी रुपयांची मोठी सवलत मिळवण्यात आली आहे.
advertisement
जैन समुदायाने त्यांच्या सामूहिक खरेदी क्षमतेचा प्रभावी नमुना दाखवत तब्बल 186 हाय-एंड लक्झरी कार्स — जसे की बीएमडब्ल्यू, ऑडी आणि मर्सिडीज खरेदी केल्या असून, या व्यवहारांवर तब्बल 21 कोटी रुपयांची सवलत मिळवली आहे. हा उपक्रम जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) या संस्थेच्या पुढाकारातून राबविण्यात आला.
JITO ही देशभरातील सुमारे 65,000 सदस्यांची नॉन-प्रॉफिट कम्युनिटी संस्था आहे. संस्थेचे उपाध्यक्ष हिमांशू शाह यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, या लक्झरी कार्सची किंमत प्रत्येकी 60 लाख ते 1.3 कोटी रुपयांदरम्यान असून, जानेवारी ते जून 2025 या कालावधीत या 186 कार्स त्यांच्या मालकांना देशभर वितरित करण्यात आल्या. या मोहिमेमुळे सदस्यांना एकूण 21 कोटी रुपयांची बचत झाली.
संस्थेने केवळ सुविधादाता (facilitator) म्हणून भूमिका निभावली असून, या व्यवहारातून कोणताही आर्थिक नफा घेतलेला नाही. हिमांशू शाह यांच्या म्हणण्यानुसार, बहुतेक कार्स गुजरातमधील जैन सदस्यांनी खरेदी केल्या.
या उपक्रमाचे नेतृत्व नितीन जैन यांनी केले. त्यांनी सांगितले की- काही JITO सदस्यांनी त्यांच्या सामूहिक खरेदी शक्तीचा वापर करून कार निर्मात्यांकडून मोठ्या प्रमाणावर सवलत मिळवण्याचा प्रस्ताव मांडला. जैन समुदायाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची खरेदी क्षमता, असे सांगत नितीन जैन यांनी स्पष्ट केले की त्यांनी थेट कार ब्रँड्सशी संपर्क साधून मोठ्या सवलतींचा लाभ मिळवला.
कंपन्यांनाही हा व्यवहार फायदेशीर ठरला, कारण अशा सामूहिक विक्रीमुळे त्यांचे मार्केटिंग खर्च वाचले. त्यामुळे दोघांसाठीही ही ‘विन-विन’ परिस्थिती निर्माण झाली.
सुरुवातीला काही सदस्यांनी कार्स खरेदी केल्या, त्यानंतर इतर सदस्यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. अखेर 186 कार्सची खरेदी पूर्ण झाली आणि एकूण 21 कोटींची बचत झाली. प्रत्येक सदस्याने सरासरी 8 लाख ते 17 लाख रुपयांची बचत केली. इतकी की, त्या पैशांत अजून एक कार कुटुंबासाठी घेता आली असती, असे नितीन जैन यांनी सांगितले.
आता JITO ने ‘उत्सव’ (Utsav) नावाचा नवीन उपक्रम सुरू केला असून या माध्यमातून ज्वेलरी, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांतील प्रमुख ब्रँड्सबरोबरही अशाच प्रकारचे करार करण्याची तयारी सुरू आहे.