मुंबई: भारतात सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी आजही सुरक्षित, प्रतिष्ठित आणि चांगल्या भविष्यासाठीची करिअर निवड मानली जाते. मात्र नुकतीच समोर आलेली एक बातमी अनेकांना विचार करायला लावणारी ठरली आहे. कारण रशियामध्ये एक भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअर सध्या रस्ते साफ करण्याचे काम करत असून त्याबदल्यात त्याला दरमहा जवळपास 1 लाख रुपयांचा पगार मिळत आहे.
advertisement
26 वर्षीय मुकेश मंडल हे रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरात सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. विशेष बाब म्हणजे मुकेश पूर्वी सॉफ्टवेअर डेव्हलपर होते आणि त्यांनी मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या टेक कंपन्यांशी काम केल्याचा अनुभवही आहे, याबाबतचे वृत्त LiveMintने दिले आहे.
मुकेश एकटेच असे नाहीत. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की सुमारे 17 भारतीय नागरिक सध्या रशियामध्ये रस्ते सफाईचे काम करत आहेत. या सर्वांचा बॅकग्राउंड वेगवेगळा आहे. काही जण पूर्वी वेडिंग प्लॅनिंग, काही ड्रायव्हिंग, काही आर्किटेक्चर तर काही इतर व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत होते. हे सर्वजण सुमारे चार महिन्यांपूर्वी रशियात दाखल झाले होते.
सध्या रशियामध्ये कामगारांची मोठी कमतरता भासत आहे. याच कारणामुळे तिथल्या कंपन्या परदेशातून कामगार बोलावत आहेत. सेंट पीटर्सबर्गमधील एका खासगी कंपनीने या भारतीय नागरिकांना नोकरी दिली असून त्यांना केवळ पगारच नव्हे, तर राहण्याची सोय, जेवण आणि सुरक्षेशी संबंधित सुविधाही पुरवण्यात येत आहेत.
पगाराबाबत सांगायचे झाले, तर या कामगारांना दरमहा 1 लाख ते 1.1 लाख रुपये इतकी कमाई होत आहे. भारतीय परिस्थितीच्या दृष्टीने ही रक्कम चांगली मानली जाते, विशेषतः अशा काळात जेव्हा अनेक देशांमध्ये नोकऱ्यांवर मोठा ताण आणि अनिश्चितता आहे.
मुकेश मंडल यांचे म्हणणे आहे की त्यांनी हे काम तात्पुरत्या स्वरूपात स्वीकारले आहे. काही काळ काम करून पैसे साठवणे आणि नंतर भारतात परतण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांचा ठाम विश्वास आहे की कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते; मेहनत आणि प्रामाणिकपणालाच खरे महत्त्व असते.
ही बातमी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही लोक ही गोष्ट प्रेरणादायी असल्याचे म्हणत आहेत, तर काही जण प्रश्न उपस्थित करत आहेत की इतके शिक्षित तरुण मजबुरीतून असे निर्णय घेत आहेत का?
एकूणच ही घटना बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये नोकरी आणि करिअरच्या संकल्पनाच कशा बदलत आहेत, हे दाखवून देते. जिथे एकीकडे टेक सेक्टरमध्ये अनिश्चितता वाढत आहे, तिथेच दुसरीकडे काही देशांमध्ये मॅन्युअल लेबरसाठीही चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत, हे या प्रकरणातून स्पष्ट होते.
