मोबाईल बिल वेळेवर भरल्याने तुमचं आर्थिक शिस्तबद्धपण दर्शवतं, मात्र याचा थेट परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर होत नाही. क्रेडिट युटिलायझेशन रेशोवरसुद्धा मोबाईल बिलाचं देयक प्रभाव टाकत नाही. मात्र, कर्जाची ईएमआय, क्रेडिट कार्डचा वापर आणि त्या बिलाचं वेळेवर भरले जाणं, या गोष्टी क्रेडिट स्कोरवर थेट परिणाम करतात.
सध्या जरी मोबाईल आणि इतर युटिलिटी बिलांचा क्रेडिट स्कोरवर परिणाम होत नसला, तरी काही नविन क्रेडिट स्कोअरिंग मॉडेल्सवर काम सुरू आहे. या नव्या प्रणालींमध्ये मोबाईल बिलासारख्या युटिलिटी देयकांचा विचार क्रेडिट पात्रता ठरवण्यासाठी केला जाऊ शकतो. हे मॉडेल्स विशेषतः अशा लोकांसाठी फायदेशीर ठरतील, ज्यांच्याकडे कोणतीही क्रेडिट हिस्ट्री उपलब्ध नाही.
advertisement
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, मोबाईल बिल वेळेवर न भरल्यास ते थेट स्कोरवर परिणाम करत नाही, पण ते बकाया स्वरूपात कलेक्शन एजन्सीकडे पाठवलं जाऊ शकतं आणि त्यामुळे तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये नकारात्मक नोंद होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तुमच्या नावावर जर कोणतंही बिल असेल, तर ते वेळेवर भरणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात कर्ज किंवा आर्थिक व्यवहार करताना अडचण येणार नाही.
तुमचा सिबिल स्कोअर सुधारायचा असेल तर तुम्हाला आर्थिक शिस्त लागणं गरजेचं आहे. तुमची बिलं, पेमेंट वेळच्या वेळी होणं गरजेचं आहे. शिवाय तुमच्या खात्यावर काही सेविंग शिल्लक राहाणं गरजेचं आहे. तुम्ही आर्थिक शिस्त लावली नाही, पेमेंट उशिरा केलं तर मात्र त्याचा परिणाम सिबिल स्कोअरवर होऊ शकतो.
